पुणे -महिला सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर असून, त्यासाठी अनेक उपक्रम राबविले असल्याचे प्रतिपादन शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले. तसेच, आगामी काळात कोथरूड मध्ये शंभर ठिकाणी सदर मशिन कार्यान्वित करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी मंत्री पाटील यांच्या संकल्पनेतून अल्पदरात कापडी पिशव्या उपलब्ध करून देणारे मशिन कोथरूड मधील कर्वेनगर येथे कार्यान्वित केले असून, याच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे मनपा माजी शिक्षण मंडळ अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, राजाभाऊ बराटे, स्विकृत सदस्या मिताली सावळेकर, उद्योजिका सई मुळे, अग्रजचे फुडस् चे बाळकृष्ण थत्ते, कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे राजेश गुर्रम यांच्या सह इतर मान्यवर आणि कर्वेनगर भागातील नागरीक उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर असून, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबविले आहेत. आजही नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी त्याला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी अल्पदरात कापडी पिशव्यांचे मशिन उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी ही या मशिनचा आवश्य वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, आज आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना अनेक समस्या असतात. बाजारात उपलब्ध असलेले सॅनेटरी नॅपकीन आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आगामी काळात घरकाम करणाऱ्या महिलांसाठी कोथरुमधील सोसायटीमध्ये सॅनेटरी व्हेडिंग आणि व्हॅनिशिंग उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, यावेळी कापडी पिशव्यांच्या लोकार्पणानंतर नामदार पाटील यांनी स्वतः याचा वापर करून कापडी पिशवी खरेदी केली. तसेच यानंतर एका ज्येष्ठ नागरीक महिलांनाही यासाठी सहाय्य केले.

