पुणे- पुण्यातील कोविड रूग्णांना वैद्यकिय सहाय्यता पुरविण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे कोविड मदत व सहाय्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘आज देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. पुणे हे कोरोनाचे हॉट स्पॉट असल्यामुळे अनेक रूग्णांना रूग्णालयामध्ये बेड, ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही. अनेकांना रेमडेसिविर इंजेक्शन व इतर औषधे मिळत नाहीत. नागरिकांना वेळीच उपचार मिळत नसल्यामुळे अनेकांना आपले जीव गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कोविड रूग्णांना वैद्यकिय सहाय्यता पुरविण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात कोविड सहाय्य व मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील ही सर्व केंद्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन सोबत जोडली जाणार असून या ठिकाणी २४ X ७ हेल्पलाईन सुरू राहील. रूग्णांच्या मदतीसाठी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ते उपचार उपलब्ध करून देतील. शहर काँग्रेसला काही अडचणी आल्यास राज्य मदत व सहाय्य केंद्राशी थेट संपर्क करून रूग्णांच्या अडचणी सोडवू शकतात. त्यासाठी काँग्रेस पक्षाने राज्य समन्वयक म्हणून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची नेमणुक केली आहे. या संकटाच्या काळात नागरिकांची मदत करून त्यांना योग्य उपचार मिळावा हेच काँग्रेसचे ध्येय आहे.’’

नागरिकांनी वैद्यकीय सहाय्यतासाठी हेल्पलाईन नं. 7507870777, 7875450555 या क्रमांकावर सकाळी १०.०० ते रात्री १०.०० या वेळेत संपर्क करावा.
यावेळी कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, अरविंद शिंदे, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, अमिर शेख, राजेंद्र शिरसाट, रमेश अय्यर, सचिन आडेकर, सोनाली मारणे, विशाल मलके, भुषण रानभरे, अनिस खान, सुनिल पंडित, अविनाश सोळुंके, प्रसन्न मोरे, कल्पेश पांचाळ, परमेश्वर अंडिल, देविदास मगर, नारायण पाटोळे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

