तुंबलेल्या मुंबईची प्रविण दरेकरांकडून पाहणी
मुंबई, दि.९ जून : पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी प्रचंड पाणी साचलं, मुंबईची अक्षरशः दैना उडाली असून याला पूर्णपणे महापालिकेची निष्क्रियता जबाबदार आहे. हायटाईड आणि मुसळधार पावसाची सवय मुंबईकरांना आहे. पण वर्षभराच्या काळात पाणी साचू नये म्हणून जे नियोजन आवश्यक होतं, ते दुर्दैवाने झालं नाही. त्यामुळे पुरता बट्ट्याबोळ झालेला दिसून येतो, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली. आज दरेकरांनी सायन सर्कल, हिंदमाता परिसराची पाहणी केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
अगोदरच करोना संकटात असलेल्या मुंबईकरांना पाणी साचण्याच्या संकटापासून वाचवा
मुंबईच्या या परिस्थितीची सरकारने आणि महानगरपालिकेने गांभीर्याने नोंद घेऊन पुढील काही दिवसात युद्धपातळीवर तत्काळ उपाययोजना केली तर उद्याचे मुंबईचे नुकसान थांबेल, अशी अपेक्षाही दरेकर यांनी महापालिकेकडून केली आहे. ते म्हणाले, एका बाजूला मुंबईकर कोरोना संकटकाळातून सावरत असताना या संकटाला सामोरे जावे लागणार असेल तर ते दुर्दैवी आहे. अगोदरच लोक हतबल झाले आहेत, उद्योगधंदे बंद पडले आहेत, त्यामुळे पुन्ह पाणी साचण्याच्या आणि त्यामधून होणाऱ्या नुकसानीला सामोरे जावे लागल्यास मुंबईकरांना पुन्हा उभे राहता येणार नाही.
पाच-दहा मिनिटांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काय आढावा घेतला
भरभरून देणाऱ्या मुंबईकरांची अशी थट्टा करू नका
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत जाऊन आढावा घेतला होता. याविषयी प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री थोड्या वेळापूर्वीच महापालिकेत आढावा घेण्यासाठी गेले होते. पण फक्त ५ किंवा १० मिनिटात त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा काय आढावा घेतला, कोणत्या सूचना दिल्या, काय उपाययोजना करण्यास सांगितले, यंत्रणा कशी कार्यरत केली, हे समजायला मार्ग नाही. आमचे म्हणणे एव्हढेच आहे की, अशाप्रकारे मुंबईकरांची थट्टा करू नका. मुंबैकरांनी तुम्हाला भरभरून दिले असताना अशा संकटकाळात मुंबईकरांच्या मागे खंबीरपणे जर सरकार आणि महापालिकेतील सत्ताधारी राहणार नसतील तर ते दुर्दैवी आहे.
दाव्यांचे काय झाले?
पाणी मुंबईत साचणार नाही, यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजनांबाबत दरेकर म्हणाले, आज रस्त्यावर पाणी साचून समुद्र निर्माण झाला आहे. मग इतक्या दिवसात सरकारने काय केले ? एका बाजूला मुंबई तुंबणार नाही, असे आश्वासन सत्ताधारी देत असताना आज मुंबई तुंबली कशी ?
त्यामुळे याची जबाबदारी मुंबई महापालिकेने स्वीकारली पाहिजे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

