पुणे – कोरोनाच्या येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने लहान मुलांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्यासाठी महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी असे काही मुद्दे आज महापालिकेतील कॉंग्रेस चे गटनेते आबा बागुल यांनी केले आहे .
या संदर्भात ते म्हणाले कि,पुणे शहरात कोरोनाचे रुग्णसंख्या कमी होत असून भविष्यात तिसरी लाट आल्यास यामध्ये लहान मुलांना देखील धोका निर्माण होऊ शकतो असे तज्ञांनी मत व्यक्त केलेले आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेने लहान मुलांसाठी कोविड सेंटर करणेची प्रक्रिया चालू केली आहे. मान्सूनपूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस देण्यात यावी, असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्कफोर्स आणि नव्याने स्थापन केलेल्या पीडियाट्रिक टास्कफोर्सने दिला आहे. याबाबत मिडीयाच्या माध्यमातून बातम्या आलेल्या आहेत. तिसऱ्या लाटे संदर्भात अनेक लहान मुलांचे पालकांमध्ये भीतीदायक वातावरण तयार झालेले आहे.
दोन्ही टास्कफोर्समधील डॉक्टरांनी केलेल्या आवाहनानुसार इन्फ्लूएन्झाची लस दिल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, ज्यामुळे रुग्णालयांवर ताण कमी होऊन अनावश्यक चाचणी रोखण्यास मदत होईल, असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे. इन्फ्लूएन्झा लसीमध्ये ‘इन्फ्लूएन्झा ए’चे दोन उपप्रकार आणि इन्फ्लूएन्झा बीचे दोन उपप्रकार असून या लसीचे डोस मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या लसींचा हा भाग नाही. या लसीच्या एका डोसची किंमत 1,500 ते 2,000 रुपये असू शकते अशी माहिती मिडीयाच्या माध्यमातून मिळालेली आहे. राज्याच्या कोविड टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्या मतानुसार “इन्फ्लूएन्झा लस तातडीने मुलांना द्यावी. सदर लस बाजारात उपलब्ध असून या लशीची किंमत पाहता बहुतांश मध्यम आणि उच्चवर्गीयांना परवडणारी आहे. हि लस गरीब कुटुंबातील मुलांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने याबाबत महापालिकेने विचार विनिमय करून लस उपलब्ध करावी. पीडियाट्रिक टास्कफोर्सचे सदस्य डॉ. विजय येवले म्हणाले की, “फ्लू देखील श्वसनाचा आजार आहे. ही लस नियमितपणे पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दिली जाते. या लसीमुळे अल्पवयीन मुलांमधील तीव्र स्थितीतला श्वसनाचा आजार रोखण्यास मदत होते.” ज्या मुलांचा नियमित लसीकरणात डोस राहिला असेल त्यांनी तो घ्यावा. “कोविडची लक्षणे दिसल्यानंतर चार आठवड्यांनी बीसीजी, गोवर रुबेला किंवा कोणत्याही लसीचे डोस राहिले असतील त्यांनी ते घ्यावेत,” असंही तज्ञांनी मत वर्तविले असून पुणे महापालिकेने याबाबत पक्षनेते, पुणे शहरातील संबंधित तज्ञ डॉक्टर्स यांची बैठक आयुक्तांच्या उपस्थितीत बोलवावी, अशी मागणी आबा बागुल यांनी महापौर यांचे कडे केलेली आहे.

