पुणे-केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट मंत्री निर्मला सीतारामन आज पुण्यातील सिंबॉयसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या 19 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या, की एक उत्तम भविष्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी तयारी करा. “भारताने आता टंचाईपासून ते समृद्धतेपर्यंतचा प्रवास केला आहे. गेल्या दोन दशकात, लँडलाईन फोन्सपासून ते मोबाइल वॉलेट्स पर्यंत आपण परिवर्तनाचा जणू महासागर पाहिला आहे.”
भारताच्या जी-20 अध्यक्षपदाविषयी बोलतांना केंद्रीय वित्तमंत्र्यांनी, विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांनी, “ एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भाविष्य” या संकल्पनेसाठी योगदान द्यावे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एक डिसेंबर 2022 पासून जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. भारताच्या अध्यक्षपदाचे उद्दिष्ट “ वसुधैव कुटुंबकम: एक पृथ्वी,एक कुटुंब, एक भविष्य” असे आहे. पंतप्रधानांनी लाईफ ही संकल्पना देखील निर्माण केली आहे, ज्याचा अर्थ ‘पर्यावरणअनुकूल जीवनशैली’ असा आहे. परिवर्तन आणणे आणि परिवर्तनासाठी स्वतः सज्ज असणे यांचा लाईफ- संकल्पनेत समावेश आहे. आपल्याला आपल्या जीवनशैलीत असे बदल घडवायचे आहेत ज्यामुळे,आज आपण पर्यावरणावर जो भार टाकतो आहोत, तो पडणार नाही. आणि असे बदल केले तरच, आपल्याला पुढच्या पिढ्यांसाठी नैसर्गिक स्त्रोत शिल्लक ठेवता येतील नाहीतर, आपल्याला हवामान बदलाशी संबंधित गंभीर संकटांचा सामना करावा लागेल.”
मूल्याधारीत शिक्षणावर भर देतांना, वित्तमंत्री म्हणाल्या की जेव्हा, कोविडोत्तर काळात, सगळ्या जगाची जवळपास पुनर्रचना होत आहे, अशावेळी, मूल्याधारीत शिक्षणाची नितांत गरज आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले, की, काय योग्य आणि काय अयोग्य याचा निर्णय घेण्यासाठी, आपले हृदय आणि अंतरात्मा काय म्हणतो, याचा विचार करा, आणि त्यानुसारच निर्णय घ्या. “काहीही करायचे असेल, तर त्याचा योग्य मार्ग काय आहे, हे तुमचे मन आणि तुमच्या अंतरात्म्याचा आवाज तुम्हाला बरोबर सांगत असते. सांस्कृतिक दृष्ट्या वारसा परंपरेने समाजात चालत आलेली मूल्ये, आपल्यात ही विवेकबुद्धी वापरण्याची क्षमता देतात. ही क्षमताच आपल्याला काय योग्य, काय अयोग्य, यातला फरक स्पष्ट करत, आपल्याला अधिक सुजाण बनवत असते.”
या दीक्षांत समारंभात केंद्रीय वित्तमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना डी लिट पदवी (मानद डॉक्टर ऑफ लेटर्स पदवी), सुवर्ण पदके आणि इतर पुरस्कार प्रदान केले. पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या 13 परिसरात, एमबीएच्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला.
ओमानच्या परराष्ट्र व्यापार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य, वाणिज्य उद्योग आणि आंतरराष्ट्रीय सहकार मंत्रालयाचे सल्लागार पंकज खिमजी आणि आयसीएमआरच्या पंडित राष्ट्रीय अध्यासनाचे डॉ. रमण गंगाखेडकर, यांनाही या वर्षी विद्यापीठाने डी.लिट.पदवी प्रदान केली.

दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरु डॉ. एस बी मुजुमदार होते.

