मुंबई- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी आत्महत्यांविषयी माहिती दिली आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत एकूण 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचे ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, या आत्महत्यांपैकी 491 प्रकरणे ही जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवली असल्याचे देखील वडेट्टीवार म्हणाले. यासोबतच त्यांना आर्थिक मदतही दिली असल्याची माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. मात्र नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तसंच आर्थिक सहाय्य आणि आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर वडेट्टीवारांनी उत्तर दिले आहे.
213 प्रकरणे अपात्र ठरवली
शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, ‘जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांमधून जिल्हास्तरीय समितीने 491 पात्र ठरवल्या आहेत. 213 अपात्र ठरवल्या आहेत. तर 372 प्रकरणे ही चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. पात्र असलेल्या 491 पैकी 482 जणांना मदत देखील देण्यात आल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

