पुणे : कोरोना संसर्गामुळे पुण्यात दररोज ६० ते ७० रूग्णांचा मृत्यू होत आहे. जवळपास १२०० रूग्ण गंभीर अवस्थेत आहेत. रूग्णांना दवाखान्यामध्ये बेड मिळत नाही, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. गंभीर रूग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटर मिळत नाही. रेमडेसिविर व टोसिलीजुमॅब इंजेक्शन मिळविण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहे. अशावेळी पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून पुण्याला पुरेसे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषधे मिळविण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते. मात्र, आता बापट यांनाच शोधण्याची वेळ आली आहे. पुणेकर नागरिक त्रस्त असताना खासदार पुणेकरांच्या मदतीला आले नाही. खासदार म्हणून ते आणि महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी ठरले आहेत, असा घणाघाती आरोप पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केला आहे.
पुणे शहरात भारतीय जनता पक्षाचे १ मंत्री, १ खासदार, ५ आमदार व १०० नगरसेवक असून सुध्दा त्यांनी पुणेकरांना कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत वाऱ्यावर सोडले आहे व त्यांच्या अपेक्षा भंग केल्या आहेत. केवळ जाहिरातबाजी करून नागरिकांची दिशाभुल करण्यास सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मग्न आहे. प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी जर योग्य पाऊल उचलले नाही तर पुढे त्यांना पुणेकर नागरिकांचा रोष पत्कारावा लागेल.
महापौर आणि आयुक्त हि अपयशी …
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वेळोवेळी भेटून निवेदन देत कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजनाबाबत माहिती दिली. परंतु आयुक्त कोणतेही ठोस पावले उचलताना दिसत नाही. तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे फक्त आश्वासनं देत आहेत, हे करणार , ते करणार च्या घोषणा करत आहेत , परिस्थिती गंभीर होत असताना त्यांच्याकडून या घोषणा होऊ लागल्या आहेत परंतु, वस्तूस्थिती पाहता त्यांच्याकडून वेळीच काम झालेले नाही .
जगदीश मुळीकांच्या मतदार संघात भोंगळ कारभार
पुणे महापालिकेचे १०० ऑक्सिजन व ४०० आयसोलेशन बेडचे साहित्य खराडीतील कै.विठोबा मारूती पठारे क्रीडा संकुलात धूळखात पडले आहे ही अतिशय गंभीर बाब आहे. हे क्रीडा संकुल भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या मतदार संघात आहे. सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष असून सुध्दा त्यांच्या मतदार संघात अशा प्रकारचा भोंगळा कारभार होत आहे ही शोकांतिका आहे. रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना वनवन फिरावे लागत आहे. अनेक रूग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावा लागत आहे परंतु पुणे महानगरपालिकेचे प्रशासन व सत्ताधारी भारतीय जनता पक्ष परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहे. त्या क्रीडा संकुलात भवन रचनेचे दुरूस्तीचे काम चालू आहे. महापालिकेच्या आरोग्य खात्याने अजूनही क्रीडा संकुल ताब्यात घेतले नाही.

