पुणे : सोसायटी फॉर ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सच्या (एसएई) वतीने आयोजित ‘सुप्रा एसएई इंडिया-२०२२’ राष्ट्रीय स्पर्धेत पुणे विद्यार्थी गृहाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी & जीके पाटे (वाणी) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या ‘मॅव्हेरिक’ संघाला देशात तिसरे, तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. एकूण पाच पारितोषिके या संघाने मिळवली. नुकतीच ही स्पर्धा नवी दिल्ली येथील पिथमपूरमध्ये आयोजिली होती. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ५२ संघ सहभागी झाले होते.
या इंजिनिअरिंग डिझाईन स्पर्धेत ‘पीव्हीजी’च्या यंत्र अभियांत्रिकी विभागातील २९ विद्यार्थ्यांच्या या संघाने रेसिंग कार डिझाईनिंग, डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, असेम्ब्ली अँड टेस्टिंग कॉम्पिटिशन या प्रकारात उल्लेखनीय काम केले. या स्पर्धेत पारितोषिक मिळवलेला हा महाराष्ट्रातील एकमेव संघ ठरला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम पारितोषिक म्हणून मिळाली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, संचालक प्रा. राजेंद्र कडुसकर आणि प्राचार्य मनोज तारांबळे यांनी अभिनंदन केले.
युवा इंजिनिअर्स विकसित करण्यासह त्यांना अनुभव, बांधणी व शिक्षण या त्रिसूत्रीला व्यासपीठ मिळवून देण्याचा या स्पर्धेचा उद्देश आहे. अभियांत्रिकी, प्रकल्प व्यवस्थापन व सांघिक कार्य विकसित होण्यास मदत होते. या स्पर्धेत ऑफ ट्रॅक स्थिर घटना व ऑन ट्रॅक गतिशील घटना या साखळीतून गुण मिळवता येतात. स्पर्धकांची वाढती संख्या व नवनवीन घटनांची वाढती उत्पत्ती व संख्या यावरून स्पर्धेची लोकप्रियता कळते.