पुणे -राज्यसभा निवडणुकीच्या विजयाचा भाजपकडून शनिवारी पुण्यात विविध ठिकाणी जोरदार जल्लोष करण्यात आला. विशेषतःशरद पवारांच्या राजनीतीला शह दिल्याचा आनंद भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या गगनी मावेनासा झाला होता तर कोल्हापूरचे भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विजयाने कार्यकर्ते आनंदी झालेत.भाजपचे खासदार गिरीश बापट आणि त्यांचे सहकारी या आनंदोत्सवात सहभागी होत कुठे पेढे वाट होते तर कुठे गुलाबाची फुले वाटत होती . भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील येताच कोथरूड मध्ये एकच लहर उठली , माजी महापौर मुरलीधर मोहोळ , शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी अगोदरच विविध गाण्यांवर ठेका धरत जोरदार डान्स केला होता चंद्रकात पाटील येताच ते स्वतः आणि संदीप खर्डेकर, दीपक पोटे आदी मांडली या डान्स महोत्सवात सहभागी झाली.
फुगडी खेळून आनंदोत्सव
पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीसमोर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,गणेश बिडकर ,राजेश येनपुरे यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. यावेळी एकमेकांना पेढे भरविण्यात आले. तर महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. मुळीक म्हणाले, भाजपच्या या विजयाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेले आहे. फडणवीस यांनी योग्यप्रकारे मतांची बेरीज करत तिसऱ्या पदासाठी उमेदवार कोटा नसतानाही निवडून आणण्यात यश मिळवले. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला अपयश आल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष असतानाही, शिवसेनेने त्याला बाजूला केले त्याला राज्यसभा निवडणूकीच्या माध्यमातून प्रत्युत्तर मिळाले आहे. आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीतही या विजयाचा आम्हाला फायदा होईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विविध पदांच्या निवडणुकीत भाजपचा हाच झंजावात आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दिसून येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.