नागपूर-महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक मतमोजणीत ५४९ मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, रवींद्र भोयर यांना १, मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली. तर अकोल्यात भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजी मारलीय.
राज्यातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकांची आज मतमोजणी होत आहे. निवडणूक आयोगाकडून या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या आहेत तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यात आली आहे. दरम्यान अकोला आणि नागपुरात भाजपने बाजी मारली आहे. नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा या दोन्ही जागांवर भाजप उमेदवार हे विजयी झाले आहेत. दोन्ही उमेदवारांच्या विजयाची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.
विधान परिषदेच्या या दोन्ही जागांवर 10 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज या निवडणुकांची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये दोन्हीही जागांवर भाजपने बाजी मारली आहे.
अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल हे दोघे निवडणुकींच्या रिंगणात उतरलेले होते. यामध्ये भाजपचे वंसत खंडेलवाल यांनी शिवसेनेला पराभवाची धूळ चारली झाले. शिवसेना गोपिकीशन बाजोरिया यांना 334 तर भाजप वसंत खंडेलवाल 443 मते पडली आहेत. गेल्या तीन टर्मपासून आमदार असलेल्या गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.