नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावण्यानंतर देशभरात काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील राजभवनावर आंदोलन काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा अडवला आहे. पोलिसांनी राज भवन परिसरात बॅरिकेटींग केली असून, राजभवनाची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.अशोक चव्हाण ,अमित देशमुख, विश्वजित कदम, मोहन जोशी ,नाना पटोले,भाई जगताप,बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड अतुल लोंढें सह महाराष्ट्रातील अनेक कॉंग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले .
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गेल्या दोन दिवसांपासून ईडी चौकशी करत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ईडी आणि भाजपचा निषेध करण्यासाठी देशभरात आंदोलनाची हाक दिली आहे. संतप्त आंदोलकांनी ‘मै भी राहुल’ असे फलक हातात घेतले आहेत. काँग्रेसच्या या मोर्चात नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप देखील सहभागी झाले होते.
मोर्चा अडवला
राजभवनापासून 500 मीटर अंतरावर हा मोर्चा अडवण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्याचे म्हणणे आहे की, हा मोर्चा आम्हाला राजभवनापर्यंत नेऊ द्या आम्हाला राहुल गांधी यांच्यावर कारवाईचा निषेध व्यक्त करत राज्यपालांना निवेदन द्यायचे आहे.
शुक्रवारी पुन्हा चौकशी
नॅशनल हेराल्डप्रकरणी आता राहुल गांधी यांची शुक्रवारी चौकशी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना आतापर्यंत केवळ 50% प्रश्न विचारण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांना ईडी कार्यालयात बोलावणे सुरूच राहील.
एकीकडे ईडीचे अधिकारी त्यांच्या उत्तरांवर असमाधानी दिसले, तर दुसरीकडे, राहुल गांधींना असेही म्हणावे लागले की, आता त्यांना दररोज येथे यावे लागेल, कारण चौकशी बराच काळ चालणार आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार अॅडव्होकेट विवेक तन्खा यांनी राहुल गांधी यांच्या प्रश्नासंबंधीचे वृत्त लीक झाल्यानंतर गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि कायदा मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे.
बुधवारी तिसऱ्या दिवशी राहुल गांधी चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले. दुपारी बारा वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती, ती रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली. राहुल गांधींची आतापर्यंत 30 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, राहुल यांच्या अटकेच्या अफवाही उडत होत्या. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांची पोलिसांशी झटापटही झाली.