बंगालमध्ये 79.79% आणि असाममध्ये 72.14% मतदान
नवी दिल्ली-पश्चिम बंगाल आणि असाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडले. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी(दि.28) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, असाम आणि बंगाल या निवडणुकीपूर्वी राजकीय हिंसाचारासाठी ओळखले जायचे. पण, या दोन्ही ठिकाणी पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान पार पडले. हे येणाऱ्या काळाचे शूभ संकेत आहेत. यावेळी शहा यांनी दावा केला की, बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील 30 पैकी 26 आणि एकूण 200 जागा जिंकून भाजप बंगालमध्ये सत्ता स्थापन करेल. याशिवाय, असाममध्ये 47 पैकी 37 जागा जिंकण्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.
अमित शहा म्हणाले की, बंगालमध्ये 200 आणि असाममध्ये आधीपेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असाममध्ये जो विकास झाला आहे, त्यामुळे जनता आमच्या बाजूनेच कौल देणार. डबल इंजिन सरकारची संकल्पना असामच्या जनतेला भाजपच्या आचरणातून समजली.
दीदीने बंगालच्या जनतेला निराश केले
यावेळी अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, बंगालमध्ये तुष्टीकरण, घुसखोरी, भ्रष्टाचार पसरला होता. कोरोना विरोधातील लढाई, अंफानमध्ये हलगर्जीपणा, महिला सुरक्षासारख्या मुद्द्यावरुन जनता ममता बॅनर्जींवर नाराज आहे. 27 वर्षांच्या डाव्यांच्या शासनानंतर जनतेला दीदीकडून खूप आशा होती, पण दीदींनी जनतेला निराश केले.
बंगालमध्ये 79.79% आणि असाममध्ये 72.14% मतदान
पश्चिम बंगाल आणि असामच्या एकूण 77 जागांसाठी शनिवारी मतदान झाले. यात बंगालच्या 30 आणि असामच्या 47 जागा होत्या. इलेक्शन कमीशनने सांगितल्यानुसार बंगालमध्ये 79.79% आणि असाममध्ये 72.14% मतदान झाले.

