पुणे-आज देखील पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. तुकाराम सुपेंच्या अटकेनंतर आज अजून एका अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. परीक्षा विभागाचा माजी आयुक्त सुखदेव डेरेंना पुणे पोलिसांनी अटक केली. यानंतर पुण्याच्या आयुक्तांनी 2018 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, ‘2018 मध्ये घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची माहिती आहे. 2018 च्या टीईटी परीक्षेतही मोठा गैरव्यवहार झाला होता. या वेळचा प्रमुख सुत्रधार सुखदेव डेरेला अटक केली आहे. त्यावेळीही जीए टेक्नॉलॉजीकडे परीक्षांसंदर्भात कंत्राट होते. याप्रकरणी एकूण आठ गुन्हेगार आहेत. त्यामधील आणखी दोघांना अटक केली आहे.’
पुण्याचे पोलिस आयुक्त पुढे म्हणाले की, ‘2018 मध्ये गुणपत्रिकेद्वारे हा गैरव्यवहार केला गेला होता. गुणपत्रिकेद्वारे हे करता आले नाही तर उमेदवारांना उत्तरपत्रिका रिकामी ठेवा असे सांगितले जात होते. त्यानंतर त्या उत्तरपत्रिकेवर चिन्हाची खूण करुन नापास उमेदवारला कॉम्प्युटरवर नोंदणी करत असताना उत्तीर्ण दाखवले जात होते. अशाप्रकारे जवळपास 500 जणांचे खोटे निकाल देण्यात आले होते. त्यांनी बऱ्याच प्रमाणात खोटी प्रमाणपत्रेही दिली आहेत. 2018 मध्ये याप्रकरणी एकच गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यावेळी त्याचा अधिक तपास झाल्यामुळे अधिक कारवाई झाली नव्हती’

