ब्राह्मण महासंघातर्फे श्रीमंत बाजीराव पेशवा जयंती उत्साहात साजरी
पुणे- येत्या आठ दिवसात आवश्यक परवानग्या मिळवून श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या पुतळ्यास कायमस्वरूपी शिडी उपलब्ध करून देऊ, या साठी आपण तातडीने व्यवस्था करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला देत आहोत असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीयेथे सांगितले .आवश्यकता भासल्यास यासाठी महापौर निधीतून निधी उपलब्ध करून देऊ असे ही ते म्हणाले.पुणे महानगरपालिका आणि ब्राह्मण महासंघातर्फे बाजीराव पेशवा यांच्या शनिवारवाडा येथील पुतळ्यास जयंतीदिनी माल्यार्पण करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, शिक्षण मंडळ अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे,भाजप चे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, इतिहासकार मोहन शेटे, विद्याधर नारगोळकर, बाजीराव पेशवा प्रतिष्ठान चे कुंदन साठे, श्री. गांगल, मनपा सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापौर वा उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते शैलेश जोशी लिखित शिवशाहीचा उत्तरार्ध अर्थात पेशवाई चा इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.मराठा साम्राज्याचे सेनापती अजेय योद्धा बाजीराव पेशवा यांचे स्मरण करणे आपले कर्तव्यच असून पुतळा परिसराच्या विकासासाठी जे जे काही लागेल ते करण्यासाठी पुणे मनपा कटीबद्ध आहे असे ही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. किंबहुना बाजीरावांच्या अफाट कर्तृत्वापुढे नतमस्तक होताना त्यांच्या स्मृती आणि वैभवशाली इतिहास जतन करण्यासाठी माझा हातभार लागला तर मी नशीबवान ठरेन असेही ते म्हणाले. तत्पूर्वी ब्राह्मण महासंघातर्फे लालमहाल ते शनिवारवाडा अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. बँड पथकसह,पारंपरिक वेशभूषेत फुगडी खेळणाऱ्या महिला व बाजीरावांच्या वेशातील चिमुकला गणेश दवे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी बाजीरावांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले. तसेच पुतळ्यास माल्यार्पण करणे सुकर व्हावे यासाठी शिडी चा खर्च ब्राह्मण महासंघ करेल असे सांगितले.संदीप खर्डेकर म्हणाले ” छत्रपती शिवाजी महाराजांचे शिष्योत्तम असलेले सेनापती आणि अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या जयंतीदिनी आज मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया अन्य सहकारी मंत्र्यांसह आज बाजीरावांच्या मध्यप्रदेशातील रावेरखेडी येथील समाधीस्थळी जात असून, समाधीस्थाळाच्या नूतनीकरण वा सुशोभीकारणाच्या 29 कोटींच्या आराखड्याचा कामाचा शुभारंभ करणार आहेत ही समस्त मराठी जणांसाठी अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे.आपण सर्वांनीच ह्या थोर सेनापती चा दैदीप्यमान इतिहास भावी पिढी समोर आदर्श म्हणून मांडला पाहिजे असेही संदीप खर्डेकर म्हणाले. ब्राह्मण महासंघातर्फे आंनद दवे,मयुरेश अरगडे यांच्या हस्ते महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी काढण्यात आलेल्या शोभयात्रेचे संयोजन ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे, विश्वस्त मनोज तारे,श्रीपाद कुलकर्णी जिल्हा अध्यक्ष मयुरेश अरगडे, शहर अध्यक्ष हर्षद ठकार, महिला आघाडीच्या तृप्ती तारे,सुमन कुलकर्णी ,मधुरा बर्वे,निता जोशी ,क्रांती गोखले, विद्या घटवाई यांनी केले.


