शैक्षणिक संस्थांनी ‘डिजीटल विश्वा’ मध्ये पुढे यावे – डॉ. माणिकराव साळुंखे
पुणे ः
‘शैक्षणिक संस्थांच्या प्रगतीमध्ये आणि विकासामध्ये ‘डिजीटल मार्केटिंग’चा मोठा उपयोग होऊ शकतो, त्यामुळे नियोजनपूर्वक सर्व डिजीटल माध्यमे वापरून डिजीटल विश्वात पुढे यावे,’ असे आवाहन ‘भारती विद्यापीठा’चे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
‘भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रपु्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) मध्ये आयोजित दोन दिवसीय ‘फॅकल्टी मॅनेजमेंट प्रोग्राम’चे उद्घाटन करताना ते बोलत होते. ‘आयएमईडी’च्या एरवंडणे कॅम्पसमध्ये 8,9 जून रोजी हा फॅकल्टी मॅनेजमेंट प्रोग्राम पार पडला.
‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी डॉ. माणिकराव साळुंखे यांचा सत्कार केला. ‘भारती विद्यापीठा’च्या शैक्षणिक आस्थापनातील प्राध्यापक या ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’मध्ये सहभागी झाले. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी उद्घाटन केले.
यावेळी बोलताना साळुंखे म्हणाले, ‘डिजीटल अर्थव्यवस्थेमुळे प्रचलित समीकरणे आणि प्रथा बदलत आहेत. त्यामुळे सर्वच धोरणांची फेररचना करावी लागत आहे. ‘डिजीटल मार्केटिंग’हे त्यामुळेच महत्त्वाचे झाले असून, शैक्षणिक संस्थांनी ते अंगीकृत केले पाहिजे. शैक्षणिक संस्थांच्या प्रगतीमध्ये आणि विकासामध्ये ‘डिजीटल’ मार्केटिंगचा मोठा उपयोग होऊ शकतो, त्यामुळे नियोजनपूर्वक सर्व डिजीटल माध्यमे वापरून डिजीटल विश्वात पुढे यावे.’
‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या सर्वेक्षणात ‘आयएमईडी’ला पुण्यात प्रथम क्रमांत तर देशात 40 वा क्रमांक मिळाल्याची माहिती देवून इन्स्टिट्यूटच्या उपक्रमांचा आढावा घेतला. ‘डिजीटल मार्केटिंग’च्या माध्यमातून ‘आयएमईडी’ उद्योग जगत आणि विद्यार्थ्यांना जवळ आणत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.