प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरु करा
पुणे-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी अजून महापालिकेने काहीही केल्याचे दिसत नसून तातडीने लासी उपलब्ध करवून घेऊन महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात १८ ते ४४ पर्यंत च्या युवा लसीकरण केंद्रे कार्यान्वित केली पाहिजेत . भाजपची सत्ता असलेल्या केंद्राकडून महापालिकेच्या भाजपच्या सत्ताधारींनी याबाबत समन्वय साधून युवा आणि पुढे बालकांच्या देखील आरोग्याची काळजी म्हणून आता तैनात राहायला हवे असे राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी म्हटले आहे.
या संदर्भात तांबे यांनी महापालिका आयुक्तांना गेल्या आठवड्यात लेखी पत्र दिले आहे त्यात म्हटले आहे कि ,’पुणे शहरातील वाढती कोरोना संसर्गाची आकडेवारी लक्षात घेता व कोरोना संसर्गाची दुसरी लाट व संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या कोरोना लाटेचा विचार करता शहरातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत वय वर्ष 45 ते 60 या वयोमानातील लसीकरण पूर्ण शहरातील केंद्रावर चालू आहे, पण केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे वय वर्ष 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करून घेणे बाबत पुणे शहरात वेगवान पद्धतीने लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 18 ते 44 वयोगटासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र चालू करणे गरजेचे आहे. यामुळे 18 ते 40 वयोगटातील नागरिकांची लसीकरण लवकरात लवकर स्थानिक पातळीवर पूर्ण करून घेण्यास मदत होईल व त्या लसीकरण केंद्रावरील आरोग्य सुविधांवरील ताण कमी होईल.
विशाल तांबे यांनी पुढे असेही म्हटले आहे कि ,’ माझ्या प्रभाग क्रमांक 39 धनकवडी आंबेगाव पठार येथील शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन येथे तिसऱ्या मजल्यावर अत्यंत नियोजनबद्ध पध्दतीने 45 ते 60 वयोमानातील वर्गासाठी कोरोना लसीकरण केंद्र सुरू असून त्याच ठिकाणी वास्तुमधील अद्यावत असलेल्या चौथ्या मजल्यावरील शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे बहुउद्देशीय हॉल येथे धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 18 ते 40 वयोगटातील नागरिकांसाठी स्वतंत्र कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे, सर्व सोयी सुविधा युक्त या ठिकाणी फक्त 18 ते 44 वर्षे वर्गातील नागरिकांसाठी स्वतंत्र केंद्र सुरू केल्यास लसीकरणाचा मोठा टप्पा आपण लवकर पूर्णत्वास नेऊ शकतो. व यामुळे आरोग्य सुविधांवरील ताण ही कमी होण्यास मदत होईल, याबाबत आपण सकारात्मक विचार करावा.