पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांसह ४ जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईबाबत महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात येतो आहे . विरोधकांच्या या आरोपांना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. ही कारवाई सूडबुद्धीने झालेली नाही. जर तुम्ही भ्रष्टाचार केला नाही तर तुम्ही त्यात सापडू शकता का? असा प्रतिसवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
सूडबुद्धीनं कारवाई हे चुकीचं वक्तव्य आहे. त्याला काही अर्थ नाही, असं अजित पवार म्हणाले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांवर कारवाई झाली तर आम्ही कारवाई केली. जर आमच्यावर कारवाई झाली तर त्या संस्थेला मुभा आहे म्हणून कारवाई झाली असे बोलतात. वास्तविक कुणाचं तरी काहीतरी चुकलं आहे म्हणून एसीबीने कारवाई केली आहे. या कारवाईत राजकीय हेतू नाही. प्रत्येकानं पारदर्शकपणे काम करावं ही जनतेची अपेक्षा आहे. कुणी चुकीचं काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं हे एसीबीचं काम आहे. कुठेतरी पाणी मुरत असेल तर त्या लोकांना शासन करणं हे एसीबीच्या कामाचा भाग असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय.

