कित्येक वर्षानंतर झाली बेधडक कारवाई …सारसबागेतील पावभाजीवाले हटविले-रस्त्याचा श्वास झाला मोकळा पुणे ..सारस बाग ते पेशवेपार्क दरम्यानच्या रस्त्यावरील स्टॉल अतिक्रमण प्रमुख माधव जगताप यांच्या आदेशाने उध्वस्त करून रस्ता मोकळा करण्यात आला.काही लोकप्रतिनिधी,माजी महापौर,एखादा पोलीस अधिकारी अशा बड्यांचे बेनामी स्टॉल्स येथे होते असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे येथे वर्षानुवर्षे कारवाई होत नाही. आणि कारवाई साठी कुणी धजावत देखील नाही.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार पूर्वी म्हणजे १९९० ते २०१० च्या काळातही येथे अनेकदा कारवाई झाली अनेकदा येथील अतिक्रमणे मुख्यसभेत गाजली,तेव्हा येथील विक्रेत्यांनी संघटीत होऊन लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यावर दबाव आणल्याच्या घटना निदर्शनास आलेल्या आहेत, कधी अतिक्रमण खात्याचे अधिकारी येथून हप्ते घेतात अशा तक्रारी झाल्या तर येथील दुकानदार बागेचेच पाणी पाव भाजी करायला वापरतात अशाही तक्रारी झाल्या.छोट्या दुकानाच्या नावाने येथील विक्रेत्यांनी हा संपूर्ण रस्ताच बळकावला आणि आपापली हॉटेल्स येथे थाटली पर्यायाने हा रस्ता वाहतुकीस आपोपाप बंद झाला. ना पोलिसांनी त्यास कधी आक्षेप घेतला न अलीकडे कोणी लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला. पण पूर्वीच्या ९० ते २०१० या वीस वर्षात याविषयी अनेक तक्रारी झाल्या आंदोलने देखील झाली.कारवाई नंतर हे विक्रेते पुन्हा इथे आपापले हॉटेल्स थाटतात. आणि कारवाईच्या दंडात्मक रकमेने किंवा नुकसानीने त्यांना फारसा काही फरक पडत नाही हे देखील आजवर निदर्शनास आलेले आहे. येथील धंद्यावर अनेकजण गब्बर झाले. आता आयुक्त विक्रम कुमार आणि अतिक्रमण प्रमुख माधव जगताप यांनी कारवाई तर केली पण यानंतर पुन्हा येथील हि हॉटेल्स उभारली जातील काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


