रायगड सहकारी बँक लि. मुख्यालय व शाखा स्थलांतर सोहळा संपन्
मुंबई, दि. २७ एप्रिल – सहकाराच्या क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात स्थित्यंतर पाहायला मिळत आहे. पण सहकारात राजकारण आणले नाही, तरच खऱ्या अर्थाने सहकाराचा विकास करता येतो, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रायगड सहकारी बँक लि. मुख्यालय व शाखा स्थलांतर सोहळा चिंचपोकळी येथे पार पडला. विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व रायगड सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर, आमदार कालिदास कोळंबकर आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार विनायक मेटे, आमदार रमेश पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, मनसे नेते बाळा नांदगावकर, चित्रा वाघ, विद्याधर अनास्कर, विठ्ठल भोसले, प्रकाश दरेकर, काशिनाथ मोरे, श्याम सावंत आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात फडणवीस यांनी सांगितले की, रायगड बँकेवर आरबीआयने विविध निर्बंध लावले होते. परंतु प्रविण दरेकर यांनी अतिशय ताकदीने यामधील त्रुटी दुर करण्याचे काम हाती घेतले, तसेच बँकेच्या लोकांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना नेतृत्व दिले. त्यांच्या नेतृत्वामुळेच रायगड सहकारी बँक पुन्हा जोमाने सुरु होऊ शकली. शेवटी बँकेचे नाव रायगड आहे. रायगड ही उर्जाभूमी आहे. स्वराज्याची राजधानी आहे आणि जेथे रायगड आहे, जेथे उर्जा आहे, तिथे छत्रपति शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे त्यामुळे आता ही बँक सुरु झाली असून ही बँक आता कधीच मागे वळून पाहणार नाही, ही पुढे प्रगतीपथावर जात राहिल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
बँकेचे नाव रायगड असल्यामुळेच ही बँक पुर्नज्जीवीत झाली पाहिजे व ही बँक पुन्हा चांगल्या प्रकारे चालली पाहिजे असा निर्धार दरेकर यांनी केला होता. परंतु प्रविण दरेकर यांनी ही बँक सुरु केल्यामुळे आता पोलिसांच्या ईओडब्ल्यू विभागाला आणखी एक काम मिळाले आहे. उद्यापासून ईओडब्ल्यू विभागाला मुंबई बँकेसोबत रायगड बॅंकेच्या चौकशीकरिता काही तरी नवीन शोधावे लागेल. बँकेमधील काहीतरी चूक शोधून काढावी लागेल असा टोलाही फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला.
राज्य सरकार दरेकर यांच्या पाठिशी वर्षभर लागले आहेत, पण हा पठ्ठया काही त्यांच्या हाती येतच नाही आणि पुढेही लागणार नाही. परंतु आपण जर प्रामाणिकपणे काम केले असेल तर त्रास हा होतो पण आपल्याला त्यासंदर्भात निश्चितपणे न्याय मिळतो. भविष्यातही तुम्हाला त्रास होणार हे तुम्हालाही माहित आहे. परंतु हा त्रास झाला तरीही निश्चितपणे तुम्ही डगमगणार नाही व या बँकेला पुढे नेण्याचा जो तुमचा मानस आहे, तो मानस तुम्ही नक्कीच पूर्ण कराल असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या कालखंडात सहकारात अनेक गैरप्रकार झाले. पण आता त्यावर अंकुश लागतो आहे.आज अनेक सहकारी बँका मोठ्या बँकांशी स्पर्धा करीत आहेत.आता ५ लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित करण्याचा मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घेतला आणि त्यातून मोठा दिलासा सामान्यांना मिळाला असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्ष नेते व बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी सांगितले की, रायगड सहकारी बँकेला आरबीआयने लिक्विडेशनची नोटीस पाठविली होती. तरीही हिम्मतीने या बँकेला पुर्नजीवीत करण्याचा निर्धार केला व तो पूर्ण केला याचे समाधान वाटते. सहकाराला उर्जितावस्थेत आणण्याची गरज आहे. आज महाराष्ट्रातील सहकारी बँका, सहकारी संस्था अडचणीत आहेत त्यामुळे यांना दिलासा देण्यासाठी केवळ भाषणे करुन चालत नाही तर यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वेगळे मॉडेल तयार करण्याची आवश्यकता आहे. आज मुंबईतील नागरी बँकाही अडचणीत आहेत. अनेक बँका बंद पडत आहे, अश्या वेळी सरकारने या बँकाना राजाश्रय देण्याची व आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. दुदैर्वाने हे पाठबळ दिले जात नाही. तसेच कोकणातील बँकाही बंद पडत आहेत. कोकणातील मोठ्या प्रमाणात लोक या परिसरात राहतात. यामध्ये कामगार, श्रमिक, सहकारी संस्था, सहकारी पतपेढी याचा समावेश आहे. जणू हा परिसर म्हणजे सहकाराचे माहेर घर आहे. आज राजापूर सहकारी बँक, मराठा मंदिर बँक, मराठा बँक कोकण प्रांत आदी कोकणातील काही सहकारी बँका अडचणीत आल्या आहेत. याचप्रकारे रायगड सहकाही बॅंकही अडचणीत आली होती, परंतु धाडसाने आपण ही बँक चालवायला घेतली. तसेच नार्बाडने या बँकेवर जे निर्बंध टाकले होते, त्यादृष्टीने सर्व निकष पूर्ण केले व आज ही बँक प्रगतीच्या उंबरठ्यावर आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.
रायगड सहाकारी बँकेच्या उभारणीत अर्थराज्य मंत्री भागवत कराड व देवेंद्र फडणवीस यांचेही योगदान असल्याचे सांगताना दरेकर म्हणाले की, राज्यातील सहकार क्षेत्र सध्या अडचणीत आहे. त्यामुळे सरकारने या सहकार क्षेत्राला आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. एखादया अडचणीत आलेल्या बँकेला किमान २ ते ३ कोटीची मदत राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे. केंद्रामध्ये सहकार खाते हे मा. अमितजी शहा यांच्याकडे आहे तर महाराष्ट्रातील संभाजीनगरचे अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड आहेत, त्यामुळे आपल्या प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे अडचणीत आलेल्या बँका उर्जितावस्थेत आणण्याचे काम आपण केंद्र सरकारच्या मदतीने व राज्य सरकरच्या सहकार्याने करुया असेही दरेकर यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य देशातील सहकारातील अग्रगण्य राज्य आहे. सहकाराला बळकटी मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात प्रथमच सहकार खात्याची निर्मिती केली. या सहकार विभागाची जबाबदारी अमितभाई शहा यांच्याकडे दिल्यामुळे आता ख-या अर्थाने देशातीलच नव्हे तर राज्यातील सहकाराला बळकटी प्राप्त होत आहे.
देशातील शेतकरी तसेच ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेला अतिशय सोयीस्कर व सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या योजना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरु केल्या. पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीत सार्वजनिक व खासगी क्षेत्राला तसेच सहकारी क्षेत्राला बळकटी मिळाली व या विभागांचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले गेले. ग्रामीण भागातही चांगली व्यवस्था निर्माण झाली. देशातील अनेक पोस्ट ऑफिसमध्ये जनतेसाठी विविध सोयी सुविधा देण्यात आल्या. देशातील सुमारे दीड लाख पोस्ट ऑफिसमध्ये जनतेसाठी सोयी-सुविधा सुरु करण्यात आल्या असेही डॉ.कराड यांनी सांगितले.
अडचणीत आलेल्या रायगड सहाकारी बँकेला उर्जितावस्थेत आणण्याचे काम प्रविण दरेकर यांच्या माध्यमातून करण्यात आले. सहाकार क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेल्या दरेकर यांच्या धाडसाने व नेतृत्वामुळे रायगड बँक नक्कीच प्रगतीपथावर जाईल. तसेच नजिकच्या काळात रायगड बँक ही महाराष्ट्रातील आदर्श बँक म्हणून नावारुपास येईल असा विश्वासही कराड यांनी यावेळी व्यक्त केला.
सहकारात राजकारण आणले नाही, तरच सहकाराचा विकास -विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
Date:

