मुंबई-
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी आज सकाळी छापे टाकले. ईडीचे अधिकारी गेल्या चार तासांपासून तपास करत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात सीबीआय आणि ईडीचा गैरवापर होत असून भाजप या संस्थेचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. भाजपच्या अशा कृत्यांमुळे देशातील दोन महत्वाच्या मोठ्या संस्थेच अवमूल्यन होत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. ते आज मुंबईतील प्रसार माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र तपासासाठी सक्षम
अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर जर काही आरोप असतील त्या तपासासाठी महाराष्ट्र सरकार आणि न्यायालय सक्षम असून यासाठी ईडी आणि सीबीआयची गरज नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
सरकार पाच वर्षे टिकणार
ईडी आणि सीबीआयचा वापर महाराष्ट्रात आपले सरकार येईल असे जर भाजपला वाटत असेल तर अंधारात चाचपडत आहे अशी टिका संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्ष पूर्ण केले असून ते अजून पाच वर्षे टिकणार असल्याचे राऊत म्हणाले.

