सीसीटीव्ही फुटेज गायब ?
पुणे : आंबेगाव पठार येथील कचरा प्रकल्प जाळण्यात आल्याबद्दल कठोर कारवाई करण्यात येणार असून त्यात कोणी नगरसेवक दोषी असल्याचे आढळून आल्यास त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल असे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले. या प्रकरणात सहभागी असलेल्यांची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेचा आधार घेण्यात येणार असून हे फुटेज पोलिसांना देण्यात येणार आहे. पोलिसांकडून सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून आंदोलकांची ओळख परेड घेण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.दरम्यान अन्य सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याची माहिती समजते आहे.
आंबेगाव येथील कचरा प्रकल्पामधून दुर्गंधी येत असल्याचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा होत असल्याचे कारण देत या भागातील नागरिकांनी रविवारी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान प्रकल्प पेटवून देण्यात आल्याची घटना घडली. या प्रकल्पाला नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी ‘आंबेगावची फुरसुंगी होऊ दिली जाणार नाही’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी आंदोलन झाले.या साठी पोलिसांची परवानगी मागितली होती काय ? मागितली असल्यास कोणी ? कि पोलिसांच्या परवानगीविना आंदोलन झाले ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत .
या प्रकाराची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली असून या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले. कुमार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, प्रकल्प पेटवून देण्यात आल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामागे नेमकी कोणती माणसं आहेत याची माहिती घेतली जात आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ओळख पटविली जाणार आहे. हे फुटेज पोलिसांना दिले जाणार असून पोलीस या अनुषंगाने तपास करतील यासोबतच प्रकल्पावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांकडून पोलिसांनी आंदोलकांची ओळख परेड घेतली आहे. यामधून आंदोलक निष्पन्न करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या आंदोलनात कोणीही नगरसेवक, लोकप्रतिनिधी अथवा नागरिक सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. कायदा सर्वांना समान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

