पुणे: गोरगरीब लोकांना अविरत रुग्णसेवा देणाऱ्या ससून रुग्णालयाच्या सशक्तीकरणासाठी शासन दरबारी चिकाटीने पाठपुरावा करेन, असा संकल्प आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज ( बुधवारी )जाहीर केला.
ससून रुग्णालयातील आरोग्य सेवा वाढावी याकरिता जून महिन्यात पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमदार शिरोळे यांनी सूचना केल्या होत्या.रुग्णालयातील बेडस् संख्या वाढवावी, संपूर्ण जागेचा वापर कायमस्वरूपी आरोग्य व्यवस्था उभारणीसाठी व्हावा, अशा विविध सूचनांचा आढावा घेण्यासाठी ससून रुग्णालय आणि बी.जे. मेडिकल कॉलेजची पहाणी आमदार शिरोळे यांनी बुधवारी केली. या भेटीत त्यांनी रुग्णालयाच्या विकास आराखड्याची माहिती घेतली.
रुग्णालयाच्या दोन इमारतींच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर झाला असून दुरुस्तीचे काम लवकर सुरू होईल अशी माहिती प्रशासनाने दिली.
ससून रुग्णालयास सध्या हॉस्टेल आणि नर्सिंग होस्टेल याची आवश्यकता असून निधी उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच औंध जिल्हा रुग्णालयाच्या जागेत ससूनमार्फत फिजिओथेरपी हॉस्पिटल आणि डेंटल हॉस्पिटल व्हावे यासाठीही राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. या दोन्ही प्रस्तावांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार शिरोळे यांनी ससूनमधीलअधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीत सांगितले.

