मुंबई-एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर आता शिवसेनेवर निष्ठा आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याचं प्रतिज्ञापत्र देण्याची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीमोहीमच उघडली आहे. यासाठी पक्षाच्या आमदारांपासून उपशाखाप्रमुखांपर्यंत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृ्त्त्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करत आहे, असा मजकूर असलेल्या प्रतिज्ञापत्रावर आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांकडून स्वाक्षरी केली जात आहे.
प्रतिज्ञापत्रात काय लिहिलं?
“माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्त्वांवर अढळ निष्ठा आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे आणि या निष्ठेची पुनश्च पुष्टी करीत आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टय़े पूर्ण करण्यासाठी मी सदैव कायर्रत राहीन अशी ग्वाही देतो,” असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

