हिंमत असल्यास समोर या. एका गिरणी कामगाराचा पोरगा स्टेजवर आल्याचे यांना झेपत नाही काय ? – मंत्री पाटलांची शाईफेक नंतर तातडीने प्रतिक्रिया
पुणे-मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणारे कार्यकर्ते कोणत्या संघटनेचे आहेत, याबद्दल अजून माहिती समोर आली नाही. मात्र, शाईफेक करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शाईफकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.शाईफेकनंतर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंमत असल्यास समोर या. एका गिरणी कामगाराचा पोरगा स्टेजवर आल्याचे यांना झेपत नाही. भ्याड हल्ले सुरू आहेत. हिंमत असेल, तर समोर या. महाराष्ट्रात झुंडशाही चालणार नाही. पोलिसांच्या दोष देण्याचे कारण नाही. मी कुणाला घाबरत नाही. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आहे. आत्ताही कार्यक्रमाला चाललोय. उद्याही चाललोय. हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, असल्याचे ते म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले की, ज्यांनी घटना लिहिली ती तीन हजार वर्षे बदलावी लागणार नाही असेही मी बोललो. मात्र मीडियाने पराचा कावळा केला. बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून आपण आहोत. हे तुम्ही दाखवले नाही. शाळा कुणी सुरू केल्या. महर्षी धोंडो कर्वे, फुले, आंबेडकरांनी लोकसहभागातून शाळा सुरू केल्या. त्याऐवजी दुसरा शब्द वापरला. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. इतक्या पुढे आलोय. तेच संरजामशाही मनोवृत्तीला झेपत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पोलिसांना सस्पेंड करून मी त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे करावे म्हणतील ते करा. ते आंदोलन करा म्हणाले, आंदोलन करा. नाही तर नाही. त्यांचे ऐका. डॉ. आंबेडकरांनी कायदा हातात घ्यायला शिकवले नाही. मी त्यांच्या कार्यकर्त्यांना काहीच सांगणार नाही. कारण त्यांनी झोपेचे सोंग घेतलेले आहे. अजित दादा, उद्धव ठाकरे, पवार साहेब, सुषमा ताई अंधारे यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी या हल्ल्याची निंदा करावी.
केवळ सरकारी अनुदानावर विसंबून राहू नका, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी संस्थांना केले. ते म्हणाले की, देशात सध्या सर्व सरकारनेच करावे, अशी भावना निर्माण झालीय. यापूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांनी शाळा काढल्या. त्यासाठी सरकारी अनुदान घेतले नाही. भीक मागून शाळा उभ्या केल्या, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवतेय. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत.

