मुंबई- विधिमंडळात प्रत्येकानंच आपापल्या जबाबदारीचं भान ठेऊन योग्य वर्तनच ठेवायला हवं, सभागृहाचा मान सन्मान न ठेवणाऱ्यांना ४ तास हवे तर ८ तास सभागृहाबाहेर ठेवा ,१२ महिने नका ठेऊ अशा शब्दांत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनाही कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचा धागा पकडत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या भूमिकेचे स्वागत करत पाठींबा दिला पण तो देताना “मला समाधान आहे की किमान उपमुख्यमंत्र्यांना १२ आमदारांच्या निलंबन प्रश्नी वर्षभर बाहेर ठेऊ नये याची जाणीव आहे”, असा टोलाहि मारला .
फडणवीस म्हणाले “देशाची लोकसभा असेल किंवा राज्याचं विधानमंडळ असेल, यांच्यावर या लोकशाहीने राज्य चालवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे इथे आपण काय करतो, कसं वागतो या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. खासगी आयुष्यात आपण कसेही वागू शकू. पण इथे आपण जनतेचे विश्वस्त म्हणून आलो आहोत. त्यामुळे मूल्यांचं आपण पालन केलं पाहिजे. नियमांचं पालन केलं पाहिजे. सभागृहाचा दर्जा सांभाळायला हवा. व्यक्तिगत वर्तन किंवा सामुहीक वर्तनात तो कायम ठेवला पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.

