‘हृदयांतर’ चित्रपटाव्दारे विक्रम फडणीस दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पहिले पाऊल ठेवत आहेत. कौटुंबिक भावनिक नाट्य असलेल्या ‘हृदयांतर’ चित्रपटाची सध्या आतुरतेने वाट पाहिली जात आहे. हृदयांतर चित्रपटाचे कलाकार नुकतेच ह्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आले होते.
पुण्यातल्या कोरेगांव पार्कमधील मेरियट सूट येथे २४ जुनला रात्री झालेल्या बहारदार पत्रकार परिषदेमध्ये, निर्माता-दिग्दर्शक विक्रम फडणीस आणि निर्माता पुर्वेश सरनाईक ह्यांच्यासह ह्या चित्रपटाचे कलाकार मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे, अमित खेडेकर, तृष्णिका शिंदे, आणि निष्ठा वैद्य उपस्थित होते.
ह्या महिन्याच्या सुरूवातीला पुण्यात झालेल्या श्यामक दावर ह्यांच्या ‘समर फंक अवॉर्डस नाईट’मध्ये विक्रम फडणीस, ह्यांच्यासह हृदयांतर चित्रपटातल्या नित्या (तृष्णिका शिंदे) आणि नायशा (निष्ठा वैद्य) ह्या दोन्ही मुलींनी आपल्या कौटुंबिक भावनिक नाट्य असलेल्या ‘हृदयांतर’ चित्रपटाचे प्रमोशन केले होते.
विक्रम फडणीस म्हणतात, “पूणे माझ्यासाठी हृदयाच्या अगदी जवळचे शहर आहे. अनेक यशस्वी फॅशन शो केल्याच्या सुंदर आठवणी मला ह्या शहराने दिल्या आहेत. आणि मला पूर्ण विश्वास आहे, की फॅशन शो प्रमाणेच आता माझा हृदयांतर चित्रपट ही इथे यशस्वी होईल.”
निर्माता पुर्वेश सरनाईक म्हणतात, “हृदयांतर चित्रपट, कुटुंब आणि नातेसंबंधांवर आधारित आहे. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अतिशय जवळचा आहे. हा चित्रपट बनवण्याची आणि पोस्ट प्रॉडक्शनची प्रक्रिया आम्ही सर्वांनीच खूप एन्जॉय केली. अनेक लोकं मला सांगतायत, की ते सध्या ह्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.”
टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेली, यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित ‘हृदयांतर’ चित्रपट ७ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित होणाऱ आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे, तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य, अमित खेडेकर आणि मीना नाईक मुख्य भूमिकेत आहेत.