मुंबई- वैद्यकीय क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या पॅथीमधील स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत. रुग्णाचे रोगनिदान कसे करायचे? त्यावर कोणते औषध उपचार करायचे? रुग्ण दीर्घायुषी कसा होईल? या बाबी शिकविल्या जातात. विद्यार्थ्यांना सुद्धा प्रथितयश, नामांकित डॉक्टर कसे व्हावे? यापेक्षा वेगळा विचार मनात येत नाही, मात्र रुग्णाच्या खिशात पैसेच नसतील तर त्याच्यावर उपचार कसे करावेत? ही बाब वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या कोणत्याही पॅथीमध्ये शिकविली जात नाही. डॉक्टरांनी आपला व्यवसाय उत्तमरीतीने कसा करावा? या विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून उलटपक्षी डॉक्टरांनी तोटा सहन करून पुन्हा डॉक्टरांनीच कसे नीतीमान असले पाहिजे? याविषयीची चर्चा समाजात घडत असताना, उमेश चव्हाण यांनी लिहिलेले हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? हे पुस्तक रुग्णांनी तर आपल्याजवळ ठेवलेच पाहिजे त्याचबरोबर कोणाकडे पैसे नसतील तर त्याच्यावर मोफत उपचार देताना आपला व्यवसाय बुडणार नाही. हॉस्पिटलला पैसे मिळाले पाहिजेत आणि रुग्णाचेही बिल माफ झाले पाहिजे, विषयी अत्यंत सुंदर, मार्मिक, अचूक आणि व्यापक विश्लेषण या पुस्तकांमध्ये फार सुंदर रीतीने उमेश चव्हाण यांनी केले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये या पुस्तकाचा समावेश होणे फार गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध विचारवंत आणि वैद्यकीय तज्ञ डॉ. अमोल देवळेकर यांनी मुंबईत बोलताना व्यक्त केले.
रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण लिखित हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या पुस्तकाचे मुंबई मराठी पत्रकार संघ, लोकमान्य सभागृहामध्ये डॉ. अमोल देवळेकर यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर लेखक उमेश चव्हाण, डॉ. अमोल देवळेकर, प्रसिद्ध चित्रपट निर्माते निलेश नवलाखा, कवी लेखक वैभव छाया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय टिंगरे आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल हातागळे यावेळी उपस्थित होते.
उमेश चव्हाण म्हणाले की, सर्वच शासकीय योजना मोठ्या हॉस्पिटलमध्ये मिळतात. बहुसंख्येने लहान हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या गरीब रुग्णावर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना शासनाने अनुक्रमे दहा लाख आणि वीस लाखाचे वार्षिक पॅकेज जाहीर केले, तर गोरगरीब रुग्णांवर लहान हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोफत उपचार करणे शक्य होईल. हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या पुस्तकामध्ये डॉक्टरांचे संरक्षण करण्याबद्दल स्वतंत्र प्रकरण आहे, केवळ पुस्तकाच्या नावामुळे डॉक्टर बांधव दुखावले जाणे अयोग्य आहे.
राज्यात सर्वत्र हे पुस्तक उपलब्ध केले असून, सर्वत्र ऑनलाईन देण्याची ही प्रकाशकांनी व्यवस्था केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल हातागळे, धनंजय टिंगरे, निलेश नवलाखा आणि वैभव छाया यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन शशिकांत लिंबारे यांनी केले तर आभार अपर्णा साठ्ये यांनी मानले.
पुस्तकाचे नाव – हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? लेखक – उमेश चव्हाण, प्रकाशन संस्था – रिषिभ हेमराज पत्रिका मीडिया अँड प्रोडक्शन्स प्रा. लि., पाने – 312, किंमत- 595/-
हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? हे पुस्तक मिळवण्यासाठी पुढील क्रमांकावर 8805020059 संपर्क करा.

