पुणे, 12 ऑगस्ट 2022
‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 12 ऑगस्ट 2022 रोजी हवाई दलाच्या लोहगाव, पुणे येथील तळावर शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या विजेत्यांशी संवादाचेही आयोजन करण्यात आले. एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक (निवृत्त) हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला युद्ध स्मारक येथे (स्टेशन वॉर मेमोरियल )पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. हवाई दलाच्या सैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यानंतर, शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या शौर्याची गाथा सांगणारा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक (निवृत्त) यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात आले. पुरस्कार विजेत्यांशी संवाद, या कार्यक्रमात या विजेत्यांनी युद्धातील आपले वैयक्तिक अनुभव आणि किस्से सांगितले. संवादाचा हा कार्यक्रम सर्वच उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.