पुणे : लोकांच्या घरी घरकाम करणारी आई…. तुटपुंज्या पगारावर काम करणारे वडील….दोन खोल्यांमध्ये राहणारे मोठे कुटुंब…आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची… अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अरण्येश्वर परिसरात राहणाऱ्या धनश्री हिरणवाळे हिने पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षेत यश मिळवले. तिच्या या प्रेरणादायी प्रवासाचा सन्मान जनता सहकारी बँक सहकार नगर शाखेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी जनता सहकारी बँकेचे संचालक माधव माटे यांनी धनश्री हिच्याशी ऑनलाईन संवाद साधला आणि शुभेच्छा दिल्या. जनता सहकारी बँक सहकार नगर शाखेचे शाखाप्रमुख पराग ठाकूर, उपशाखा प्रमुख विलास पोकळे, शाखा चिटणीस गौरी निकम, सचिन ढवळे, अर्चना हिरणवाळे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बँकेचे संचालक माधव माटे यांनी धनश्री हिरणवाळे हिला बँकेत नोकरीचा प्रस्ताव देखील दिला.
पराग ठाकूर म्हणाले, जनता सहकारी बँकेच्यावतीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. धनश्री हिरणवाळे हिची आई घर काम करते आणि वडीलही तुटपुंज्या पगाराची नोकरी करतात. आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असताना मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सीएच्या परीक्षेत तिने यश संपादन केले. तिच्या या प्रवासातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, यासाठी बँकेच्या वतीने तिला सन्मानित करण्यात आले. यावेळी धनश्री हिरणवाळे हीचे बँकेत खाते देखील उघडण्यात आले.

