पुणे: स्वारद फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड आडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाप्पू भोसले यांचा सन्मान करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुठा गावचे सरपंच शंकरनाना मोहोळ, स्वारद फाउंडेशनच्या संस्थापिका स्वाती मोहोळ, गौरी चव्हाण, सौरभ जाधव, मारुती चव्हाण यावेळी उपस्थित होते. कामगार युनियनच्या अध्यक्षपदी निवड झालेले संतोष नागरे, सचिव विशाल केकाणे यांच्यासोबतच निवडून आलेल्या व सर्व संचालक, विविध मान्यवर,कामगार युनियनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्केटयार्डमध्ये व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच सर्व नवीन कार्यकारणी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या सर्व अडचणी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेल,अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष बाप्पू भोसले यांनी दिली.

