मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक धडक मोर्चा काढला. यावेळी सिल्व्हर ओकवर काही कर्मचाऱ्यांनी चप्पला देखील फेकल्याचं दृश्यांमधून दिसून आलं.या आंदोलनामागे असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. यामागे काही अज्ञात शक्ती असल्याचं देखील गृहमंत्री म्हणाले. “ही घटना चुकीची आहे. शरद पवार यांच्या घरावर अशा प्रकारे हल्ला होणं चुकीचं आहे. ही काळजीची गोष्ट आहे. यात इंटेलिजन्सचं फेल्युअर कुठे झालंय, ते निश्चितच शोधून काढू. आयुक्तांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. जे यामध्ये दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल”, असं वळसे पाटील म्हणाले आहेत.“समाजात कुणीही भडकाऊ विधानं करून कुणाला भडकवण्याचं काम करत असेल, तर कायदेशीर कारवाई केली जाईल. याच्या पाठिमागे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या आडून एक प्रकारची अस्वस्थता राज्यात निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष, शक्ती करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून शरद पवारांच्या निवासस्थानी अशी घटना घडवण्यात आली असू शकते. आम्ही त्याचा तपास करतो. हा अज्ञात शक्तींनी घडवलेला प्रकार आहे, हे सहन केलं जाणार नाही”, असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
दुपारी ३ च्या सुमारास काही आंदोलक एसटी कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शरद पवार यांना जबाबदार धरत थेट सिल्व्हर ओकपर्यंत पोहोचले. त्यातील काही कर्मचाऱ्यांनी तर थेट बंगल्याच्या गेटपर्यंत पोहोचत चपला फेकल्या. इतरही काही कर्मचाऱ्यांनी चपला फेकल्या. जवळपास अर्धा तास हा सगळा गोंधळ सिल्व्हर ओकबाहेर सुरू होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणली. यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी देखील आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

