मुंबई, 25 मे : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. खबरदारी म्हणून 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड सेंटर वाढवून तिथे आयसोलेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजनाबद्दल माहिती दिली.’लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरला राज्याला कोणताही प्रतिसाद नाही. त्यामुळे केंद्राने लशी आयात करावी आणि ती राज्याला पुरवावी. 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर आहे, त्यासाठी लागणार्या लसीचे पैसे राज्य सरकार द्यायला तयार आहेत’ असं टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले.’उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १८ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी यांची बैठक झाली. 2245 रुग्ण या क्षणाला म्युकरमाकोसिसचे आहेत. आरोग्य विभागाने याला नोटीफाईड आजार घोषित केला आहे. रुग्ण आणि त्यांच्याबाबतची माहिती शासनाला देणे बंधनकारक आहे. याला लागणारे एम्फोटेरेसिन इंजेक्शन्सचे नियंत्रण केंद्र सरकारने केलेला आहे. केंद्र सरकार आपल्याला देईल ते आपण प्रत्येक जिल्ह्यात याचे वाटप करतो. त्यामुळे या रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. यावर मोफत उपचार झाले पाहिजेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. यासाठी 30 कोटी रुपयांची तरतुद केली आहे, 131 रुग्णालयात यावरील उपचारांसाठी निश्चित केले आहेत’ असंही टोपे म्हणाले.

