हुकुमशाही आणि गुलामगिरीकडे देश नेला जात असताना अमृतमहोत्सव कसला ?
मुंबई : आज मुंबईत मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचा ६२ वा वर्धापन दिन आज मुंबईत पार पडला आहे. या साप्ताहिकाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे असून मुंबईत शिवसेना नसती तर देशात हिंदुत्वाचं काय झालं असतं असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमावर सरकारला धारेवर धरलं आहे.मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमावेळी बोलताना उद्ध ठाकरे बोलताना म्हणाले की, “शिवसेना आणि मार्मिककडे कायम तरूणाईचं आकर्षण राहिलं आहे. मार्मिकने लोकांच्या समस्यांना वाचा फोडली आहे. वयानं थकलं तरी चालेल पण विचाराने थकलं नाही पाहिजे. आपण दीडशे वर्ष गुलामगिरीत काढली आणि त्यानंतर आपल्याला अनेक संघर्ष करून स्वातंत्र्य मिळालं. आपण आता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय, पण फक्त तिरंगा फडकावून देशभक्त होता येत नाही.” असा टोला त्यांनी लावला आहे.सध्या केंद्रात ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांचा प्रादेशिक पक्ष संपवण्याचा डाव आहे. त्यांनी आता लोकशाहीला मृतावस्थेत नेत हुकुमशाही चालवली आहे पण शिवसेना संपणारा पक्ष नाही आहे. तुम्ही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहात पण यावेळी तुम्ही लोकशाहीला मृतावस्थेत नेत असाल तर हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कसला? असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर अनेकांना घरावर तिरंगा लावयाचा आहे पण त्यांच्याकडे घर नाही अशी अवस्था झाली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.व्यंगचित्रकारांच्या ताकदीबद्दल बोलताना “जर देश हुकुमशाहीकडे चालला असेल तर प्रत्येक व्यंगचित्रकाराने सरकारवर फटकारे मारलेच पाहिजेत.” असा संदेश उद्धव ठाकरे यांनी व्यगचित्रकारांना दिला आहे.
उद्धव म्हणाले की, काही जणांना वाटतं की, शिवसेना म्हणजे उंबऱ्यावर पडलेली वस्तू आहे. शिवसेनेची पाळमुळं ६२ वर्षांची आहे. मार्मिकचा जन्म झाला ते वर्ष १९६० आहे. मार्मिकने व्यंगचित्रकार काय करू शकतो, हे दाखवून दिलं. महाराष्ट्राने मुंबई मिळवली. मात्र मराठी लोकांवर अन्याय होतच होते. मार्मिकने व्यंगचित्रातून त्या अन्यायाला वाचा फोडली. शिवसेनाप्रमुखांनी व्यंगचित्र काढली. शिवाय शिवसेनाही काढल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की देशातील सर्व पक्ष संपून जात आहे. हे वक्तव्य लोकशाहीला घातक आहे. सत्ता येती आणि जाते. मात्र नड्डा म्हणाले देशात एकच पक्ष राहणार आहे. त्यांनी ज्याला प्रदेशाध्यक्ष केलं त्यांची किती कुळं आहेत मला माहित नाही. पण शिवसेना संपुष्टात येऊ शकत नाही. मग त्यांची ५२ असो वा १५२ कुळे असो आपल्याला फरक पडत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.