विश्वकल्याणार्थ ‘शतचंडी याग’ सोहळा संपन्न. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे तर्फे आयोजन ; महाराष्ट्राच्या विविध भागातील ३० हून अधिक ब्रह्मवृंदांचा सहभाग

पुणे : मानाजीनगर न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे तर्फे शतचंडी याग सोहळा नुकताच संपन्न झाला. तीन दिवस सुरु असलेल्या सोहळ्याला महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या ३० हून अधिक ब्रह्मवृदांची उपस्थिती लाभली.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर आणि खजिनदार सुरेखा जाधवर यांनी सोहळ्याचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी गणपती पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, होमकुंड पूजन, प्रधान देवता मंडल स्थापना, वास्तु मंडल स्थापना, भैरव मंडल स्थापना, देवी प्राणप्रतिष्ठा, अरणी मंथन पार पडले.
दुस-या दिवशी प्रधान संकल्प, देवता प्रात: पूजन, भगवती अभिषेक महापूजन, देवी अर्चन, लक्ष्मी हवन, प्रधान चंडी हवन, सायं पूजन व आरती करण्यात आली. तसेच फुलांची रंगावली व दीपोत्सव देखील करण्यात आली. तर, तिस-या दिवशी सकाळी प्रात : पूजन, अभिषेक, देवी राजोपचार पूजा, कन्यापूजन, व प्रधान चंडी हवन, स्थापित देवता हवन, देवी महाआरती होऊन शतचंडी याग सोहळ्याचा समारोप झाला.

