माजी उपमहापौर आबा बागुल यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
पुणे -कोरोना या महामारीचा उद्रेक आता संपुष्टात आला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर यंदा आषाढी यात्रा हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सोहळा पूर्वीच्याच उत्साहाने साजरा होणार आहे.त्यामुळे पुण्यनगरीत येत्या २२ व २३ जून २०२२ रोजी आगमन करणाऱ्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि पालखी मुक्कामी काळात वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पूर्व तयारीच्या अनुषंगाने आताच बैठक घ्यावी. अशी मागणी पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते व माजी नगरसेवक आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, शेकडो वर्षांपासून पालख्या आणि सोबत लाखोंचा जनसागर घेत हे सोहळे श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने पायी चालत जातात. हा सोहळा म्हणजे एक मोठे शहर रोज चालत पंढरीकडे जात असते. मार्गातील शहरे – गावे या लाखोंच्या महासागराचे अतिशय आदराने स्वागत व सेवा करीत असतात.श्री क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र देहू येथून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करताना पुण्यनगरीत मुक्कामी येतात. त्याबरोबर लाखो भाविक – वारकरी पुण्यात त्या अगोदरच दाखल होतात तसेच अनेक संतांच्या पालखी आणि दिंडी सोहळेही पुण्यात या काळात वास्तव्यास येत असतात. यंदा २२ व २३ जून २०२२ रोजी पालखी सोहळा पुण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात लाखो वारकऱ्यांच्या निवासासह, त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे, वैद्यकीय, पाणीपुरवठा, स्वच्छताविषयक कामे आदींचे नियोजन करण्यासाठी आताच एक बैठक घेणे अनिवार्य आहे. त्यात दोन वर्षांनी हा सोहळा पूर्ववत होणार असल्याने वारकरी – भाविक , नागरिक यांच्यात उत्साह अधिक असणार आहे.त्यामुळे उपाययोजनांच्या दृष्टीने प्रशासनाने पूर्व तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणे आवश्यक आहे. तसेच पालखी सोहळा काळात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी कोरोना लसीकरणाची व्यवस्था करणेबाबतही नियोजन करण्याची गरज आहे.असेही आबा बागुल यांनी नमूद केले आहे.

