लंडन : हिंदुजा कुटुंबाने 80 च्या दशकाच्या सुरुवातीस लंडन शहराला दिवाळीची ओळख करून दिली होती. त्यांचा वार्षिक दिवाळी उत्सव हा आता लंडनच्या उच्चभ्रू सामाजिक कार्यक्रमांतील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. लंडनमध्ये दिवाळीचे स्वरुप सध्या इतके व्यापक झाले आहे, की ‘टाइम्स स्क्वेयर’लाही दरवर्षी दिवाळीची रोषणाई केली जाते.
मात्र, यंदा आधी आर्थिक मंदीमुळे व त्यानंतर संपूर्ण जगाला पडलेल्या ‘कोविड-19’च्या विळख्यामुळे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आणि दिवाळीचा उत्सव नेहमीप्रमाणे साजरा करणे योग्य होणार नाही, असे हिंदुजा समूहाला वाटले. सुरक्षित अंतर व टाळेबंदीच्या काळात प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे शक्य नसले, तरी दिवाळीचा आनंद कायम ठेवण्यासाठी हिंदुजा कुटुंबाने या उत्सवाला एक वेगळा आयाम द्यायचा ठरवले. त्यानुसार, दिवाळी उत्सवाऐवजी जागतिक स्वास्थ्यासाठी आभासी प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सदिच्छा व शुभेच्छा देण्यासाठी आर्चबिशप कँटरबरी यांच्यासह विविध धर्मांतील प्रमुख सहभागी झाले. या वेगवेगळ्या आध्यात्मिक विचारसरणीच्या गुरुंनी सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उत्सवाची रंगत वाढवण्यासाठी भारतीय संगीत क्षेत्रातील कैलाश खेर, सोनु निगम, राहत फतेह अली खान, अनुप जलोटा, शंकर महादेवन, शान आणि अनुराधा पौडवाल यांच्यासारखे दिग्गज जगातील वेगवेगळ्या ठिकाणांहून यात सहभागी झाले होते. कैलाश खेर, सोनू निगम आणि राहत फतेह अली खान यांनी सकारात्मक संदेशासह खास तयार केलेली प्रार्थनात्मक गीते सादर करत सर्वांच्या चित्तवृत्ती उंचावल्या.
इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स यांनी खास दिवाळीची पणती प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रिन्स एडवर्ड यांनी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन, गृह सचिव प्रीती पटेल, परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री लॉर्ड तारीक अहमद, सामाजिक मंत्री लॉर्ड ग्रीनहाल्ग, लंडनचे महापौर सादिक खान यांनीही शुभेच्छा दिल्या. भारताचे उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्त यांनीही हिंदुजा कुटुंबासाठी खास संदेश पाठवले होते.
याप्रसंगी हिंदुजा समुहाचे सह-अध्यक्ष जी. पी. हिंदुजा म्हणाले, ‘‘दिवाळी या भारतातील दीपोत्सवाला सखोल आध्यात्मिक अर्थ लाभला आहे. सध्याच्या आव्हानात्मक काळाचा प्रत्येकजण सामना करीत असताना आणि जगभरातील विविध देश, वर्ण, संप्रदाय, लिंग यांतील लाखो लोकांना कोविडमुळे संकटांना तोंड द्यावे लागत असताना, एरवीप्रमाणे हा सण साजरा करणे योग्य नाही, असा आम्ही एक कुटुंब म्हणून विचार केला. आपण ज्या समाजात राहतो आणि काम करतो, त्याच्या हिताचा विचार करून कोणतेही काम करावे किंवा आनंद घ्यावा, अशी शिकवण माझ्या दिवंगत वडिलांनी कायमच मला दिली आहे. मला वेगळ्या पद्धतींनी गोष्टी करायला आवडतात आणि कोविडच्या मर्यादांमुळे मी स्वतःवर बंधने घालून घेणार नव्हतो; म्हणून दिवाळीची परंपरा कायम राखत सर्वांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करायचे आम्ही ठरवले. अमेरिका आणि अतिपूर्वेकडील हजारो लोकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे व आमच्या प्रयत्नांचे कौतुक केल्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. त्याचप्रमाणे आम्हाला आवर्जून शुभेच्छा पाठवणाऱ्या मान्यवरांचेही आम्ही आभार मानतो.’’
हिंदुजा समुहाविषयी :
हिंदुजा समूह हा भारतातील विविध क्षेत्रांत व्यवसाय असणारा, अग्रगण्य असा आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह आहे. तब्बल दीड लाख कर्मचाऱ्यांसह हा समूह 38 देशांत कार्यरत असून अब्जावधी डॉलर्सची त्याची उलाढाल आहे. या समुहाची स्थापना शंभर वर्षांपूर्वी पी. डी. हिंदुजा यांनी केली. ‘’काम करीत राहणे हेच माझे कर्तव्य, त्यातूनच मी काही देऊ शकेन,’’ हे त्यांचे बोधवाक्य होते.
वाहन उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, प्रसार माध्यमे, करमणूक व दळणवळण, बँकिंग व वित्त सेवा, पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा विकास, सायबर सुरक्षा, तेल व विशेष रसायने, ऊर्जा, स्थावर मालमत्ता, व्यापार व आरोग्यसेवा अशा व्यवसायांत हा समूह कार्यरत आहे. ‘हिंदुजा फाउंडेशन’च्या माध्यमातून हा समूह जगभरातील सेवाभावी आणि परोपकारी कार्यांशी जोडलेला आहे.

