मध्यान्ह भोजन योजनेमध्ये सरकारी शाळांमधील १३००० पेक्षा जास्त मुलांना जेवण पुरवून साहाय्य प्रदान केले जात आहे
हिमालया बंगलोरमधील अक्षय पात्र स्वयंपाकघराची केपेक्स आवश्यकता पूर्ण करण्यात देखील साथ देत आहे
पुणे २८ फेब्रुवारी २०२२: प्रत्येक घरामध्ये आरोग्य व सुख नांदावे आणि प्रत्येक मन आनंदी राहावे यासाठी प्रयत्न करत राहण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून हिमालया वेलनेस कंपनीने भारतातून भूकमारी आणि कुपोषण या समस्या कायमच्या दूर व्हाव्यात यासाठी काम करणाऱ्या, अक्षय पात्र फाउंडेशन या विना-नफा तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या संस्थेसोबत आधीपासून असलेली आपली भागीदारी अधिक मजबूत केली आहे. या उपक्रमामार्फत हिमालया सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या १३,००० पेक्षा जास्त मुलांना मध्यान्ह भोजन योजनेमार्फत साहाय्य प्रदान करत आहे. अक्षय पात्र फाउंडेशनच्या बंगलोर येथील स्वयंपाकघरामध्ये हेवी ड्युटी मिक्सर, रोस्टर मशीन आणि बेंच ड्रिलिंग मशीन पुरवून त्याठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केपेक्स साहाय्य देखील हिमालयाने पुरवले आहे.
शाळेत जाणारी, खास करून ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुले रोजच्या जेवणातून पुरेसे पोषण मिळत नसल्याने कुपोषणाने ग्रस्त असतात. मध्यान्ह भोजन योजनेमध्ये मुलांना वेळेवर, आरोग्यवर्धक आणि पोषक जेवण पुरवले जाते. कुपोषणाची समस्या दूर व्हावी हा यामागचा उद्देश आहे. शालेय शिक्षण अर्धवट सोडून देणाऱ्या मुलांची संख्या कमी व्हावी आणि सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढावे यासाठी देखील या योजनेचे खूप मोठे योगदान आहे.
चीफ ऑपरेटिंग ऑफिसर व चीफ फायनान्शियल ऑफिसर श्रीमती जयश्री उल्लाल यांनी सांगितले, “अल्पपोषण, लक्षात न येणारी भूक आणि स्थूलपणा हे असे महत्त्वाचे घटक आहेत जे मुले आणि वयस्कांच्या आयुष्याला, वाढीला आणि विकासाला धोकादायक ठरतात. मुलांचे भविष्य निरोगी राहायला हवे असेल तर त्यांना लहानपणापासून आवश्यक पोषण पुरवले जाणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांनी अधिक निरोगी आणि अधिक आनंदी जीवन जगावे यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी हिमालया नेहमीच प्रयत्नशील असते. आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता याबाबतीत वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक व दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्यासाठी आम्ही झटत असतो. २०१६ पासून अक्षय पात्र फाउंडेशनसोबत सातत्याने अधिकाधिक दृढ होत असलेल्या आमच्या भागीदारीमागचा विचार देखील हाच आहे. मुले आनंदी राहावीत, उत्तम पोषणाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याचा भक्कम व निरोगी पाया रचला जावा यासाठी आवश्यक साहाय्य पुरवण्याचे काम आम्ही सुरूच ठेवू.”
कृतज्ञता व्यक्त करताना द अक्षय पात्र फाउंडेशनचे सीएमओ श्री. संदीप तलवार यांनी सांगितले, “लाखो मुलांना आरोग्य आणि पोषण पुरवण्याच्या आमच्या वाटचालीत गेली अनेक वर्षे आम्हाला हिमालयाची मोलाची साथ लाभत आहे याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. आरोग्यवर्धक मध्यान्ह भोजन पुरवण्याच्या सत्कृत्यामध्ये हिमालया सातत्याने साहाय्य प्रदान करत आहे याबद्दल त्यांचे आभार! भारतभरातील वंचित समुदायांमधील मुलांना पोषक जेवण पुरवण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या कामी हिमालयाचा सहयोग खूप महत्त्वाचा ठरत आहे.”
सरकारी आणि सरकारी अनुदान प्राप्त शाळांमधील मुलांना अक्षय पात्र फाउंडेशन पोषक जेवण पुरवते. २०१६ पासून अक्षय पात्र फाउंडेशनचे कॉर्पोरेट पार्टनर म्हणून हिमालयाने आजवर सरकारी शाळांमधील ५०००० हुन जास्त मुलांना साहाय्य प्रदान केले असून गरजू शाळकरी मुलांना जवळपास ५० लाख जेवणे पुरवली गेली आहेत. याबरोबरीनेच लॉकडाऊनच्या काळात वाटप करण्यात आलेली ७१४६ “हॅप्पीनेस किट्स” किंवा सुक्या रेशनची किट्स देखील त्यांनी प्रायोजित केली होती.

