पुणे-प्रख्यात नृत्यांगना, अभिनेत्री व पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन खा. हेमामालिनी यांनी पुणे फेस्टिवलमध्ये आज शनिवार दि. ३ सप्टे. रोजी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ‘यशोदा कृष्ण’ बॅले सादर करून रसिकांवर आनंदाची बरसात केली. हेमा मालिनी यांच्या नाट्य विहार कलाकेंद्र या संस्थेच्या वतीने या बॅलेची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांना ५० सहकलावंतांनी साथ सांगत केली.
अत्यंद भव्य अशा मंचावर सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचे सौंदर्यच आगळेवेगळे होते. भव्यता हा कार्यक्रमाचा आत्मा होता तर शब्द, सूर, ताल याचा अनोखा संगम प्रेक्षकांनी अनुभवला. रंगमंचावर क्षणाक्षणाला बदलणारा प्रसंग सादर करताना राखलेला ताल अप्रतिम होता.

आज हयात नसलेले गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन यांनी शब्द आणि सूर यांचा सुरेख संगम साधला असून पार्श्वगायक सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, रूप कुमार राठोड, पामेला जैन आणि श्री. रवींद्र जैन यांच्या आवाजांचा सुरेख संगम या कार्यक्रमाची रंगत वाढवतो. नृत्य दिग्दर्शन भूषण लखांद्री यांनी प्रत्येक पात्रास प्रकट करणाऱ्या सुंदर स्टेप्स दिल्या आहेत.
हेमामालिनी यांनी पुणे फेस्टिवलमध्ये सादर केलेला हा २९ वा बॅले होता. हेमा मालिनी सादर केलेली नृत्ये आणि साधलेला ताल विलोभनीय होता. पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी व सौ. मीरा कलमाडी यांनी हेमा मालीनींचा सत्कार केला. तसेच सर्व सहकलावंतांचाबद्दल ही ऋण व्यक्त केले गेले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राज्य कॉंग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे, कॉंग्रेस नेते अॅड अभय छाजेड, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत, नितीन न्याती, सूर्यदत्त इंस्टीट्युटचे सौ. व श्री. संजय चोरडिया, डी. वाय. पाटील संस्थेच्या भाग्यश्री पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते. प्रेक्षकांनी कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली होती.
पुणे फेस्टिव्हलचे मुख्यप्रायोजक कोहिनूर ग्रुप असून उपप्रायोजक जमनालाल बजाज फाउंडेशन,नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी,सिस्का आणि सहप्रायोजक भारत फोर्ज व पंचशील आहेत.
हेमा जींचे भावपूर्ण उद्गार! श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे बॅलेच्या अखेरीस हेमा जींचा सत्कार पुणे फेस्टिव्हल चे अध्यक्ष सुरेश कलमाडी व सौ. मीरा कलमाडी यांनी केला. या प्रसंगी बोलताना पुणे फेस्टिव्हल च्या पत्र्ण अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी म्हणाल्या गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे कोणतेच कार्यक्रम होत नवते मात्र आता दोन वर्षांनंतर काहीसे मोकळे वातावरण तयार झाले असताना पुणे फेस्टिव्हल मध्ये बॅले सादर करण्याची संधी मला मिळाली या बद्दल मी पुणे फेस्टिव्हल आणि अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची आभारी आहे. पुणे फेस्टिव्हल शी माझे नाते खूप जुने आहे. पुणेकर देखील मला खूप आदर आणि प्रेम देतात या बद्दल मी त्यांना धन्यवाद देते. यंदा यशोदा कृष्ण बॅले सादर करण्या ऐवजी ‘गंगा’ बॅले मी सादर करणार होते. काही कारणामुळे हे शक्य झाले नाही. पुढचा वर्षी मात्र पुणे फेस्टिव्हल मध्ये मी ‘गंगा’ बॅले निश्तिच सादर करील असे ते म्हणाले तेव्हा साऱ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. |