मुंबई-मागील काही तासांपासून कोसळत असलेल्या पावसांमुळे मुंबईतील विविध ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर, लोकल रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.परळ टीटी येथे पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा झाला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे.
धारावी कलानगर रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे. गोरेगाव ते गुंदवली या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी आहे. सखल भागात साचलेल्या पाण्यातून वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चेंबूर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र आहे. कुर्ला हायवे जंक्शन रस्ता, चेंबूर स्टेशन परिसर, चेंबूर सब वे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं आहे. रस्ते वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा यासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत पाणी साचू नये यासाठी मुंबई महापालिकेने विशेष प्रयत्न करण्यात आले होते. हिंदमातामध्ये आज सकाळी पाणी न साचल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. मुंबई महापालिकेने या भागात साचलेले पाणी एका मोठ्या भूमिगत टँकमध्ये साठवण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या परिणामी या भागात पाणी साचले नाही.
घाटकोपर येथील खंडोबा टेकडीवर असलेल्या पंचशील नगर येथे एका घरावर दरड कोसळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. घटना घडली तेव्हा घरात पाचजण होते. दरडीच्या भागासह एक झाड घरावर कोसळले. या घटनेनंतर घरातले संपूर्ण कुटुंब जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडले. घराचे मोठे नुकसान झाले आहे.
पावसामुळे पाणी साचल्याने बेस्ट बसचे काही मार्ग बदलण्यात आले आहेत. बस क्रमांक 357, 360, 355 (मर्यादित) या बसेस चेंबूर शेल कॉलनी येथून डॉ. आंबेडकर उद्यान मार्गे, चेंबूर नाका ते सुमन नगर पर्यंत धावणार आहेत. तर, सायन रोड क्रमांक 24 येथील सर्व बसेस मुख्य मार्गाने धावणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आज सायंकाळी 4.10 वाजता भरती येणार असून 4.01 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. तर, रात्री 10.21 वाजता ओहोटी येणार आहे.
कोल्हापुरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. या पावसामुळं नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होताना दिसत आहे. कालच्या एका रात्री पंचगंगेची पाणी पातळी तब्बल 7 फुटांनी वाढली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 24 फुटांचवर पोहोचली आहे. या पावसामुळं जिल्ह्यातले सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, काल दिवसभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सध्याही पावसाची संततधार सुरुच आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील पश्चिमेकडचे जे तालुके आहेत, त्याठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं जिल्ह्यातील सगळ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 2019 आणि 2021 कोल्हापुरात मोठा पूर आला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतली आहे.
पुण्यात धीम्या गतीने पाऊस

कोल्हापूर जिल्हातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमानची आकडेवारी (MM) दिनांक 05/7/2022
1) कागल=38 2) गारगोटी=46 3) हातकणंगले= 4) गडहिंग्लज =42 5) राधानगरी=109 6) आजरा=54 7) शिरोळ=10 8) शाहूवाडी=22 9) पन्हाळा=68 10) गगनबावडा=259 11) चंदगड=69
जिल्हा रत्नागिरी दि 05/7/2022
खेड-74
लांजा-342
चिपळूण-169
देवरुख-210
मंडणगड-205
दापोली-145
गुहागर-77
वाकवली-121
पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल दिनांक 05/07/2022 1)वसई:-136.00 मी मी 2)जव्हार:- 36.00 मी मी 3) विक्रमगड:-81.00 मी मी 4) मोखाडा:- 19.00 मी मी 5) वाडा :- 89.25 मी मी 6)डहाणू :- 131.22 मी मी 7) पालघर:-183.5 मी मी 8) तलासरी :- 133.0 मी मी


