पुणे-देवस्थानच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरपुणे : तळजाई माता देवस्थानतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३२५ महिलांनी शिबिरात सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली. स्तन कर्करोगाबद्दल जनजागृती करून उपस्थित महिलांना माहिती देखील शिबिरात देण्यात आली.
तळजाई माता देवस्थानचे प्रमुख अण्णा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झाले. विजय थोरात, सुरज थोरात, अमोल पडळकर, प्रणव मलभारे, तन्मय पारवे, ओंकार थोरात, किरण जगताप, शाम खंडेलवाल, यश खंडेलवाल, नाना साठे यांनी शिबिरात सक्रिय सहभाग घेतला. तळजाई माता देवस्थानच्या वतीने सहकार नगरमधील पाचगाव पर्वती पठारावर मंदिराच्या परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल, लायन्स क्लब ऑफ पुणे अशोकनगर गोल्ड, लायन्स क्लब ऑफ पुणे २१ सेंचुरी, लायन्स क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम यांचे सहकार्य मिळाले.
अण्णा थोरात म्हणाले, महिला संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात परंतु स्वतःची काळजी घेण्याकडे मात्र त्या दुर्लक्ष करतात. नवरात्रीनिमित्त असंख्य महिला मंदिरात दर्शनासाठी येतात, याचे निमित्त साधून देवस्थानच्यावतीने महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोग निदान, उपचार व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन महिलांना उपलब्ध करून देण्यात आले. ब्रेस्ट कॅन्सर चेकअप, डोळ्यांची तपासणी, मधुमेह आणि रक्तदाब तपासणी या शिबिरात करण्यात आली.

