मुंबई- माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ‘भाजपाचा जन्म हा 1980 च्या दशकामध्ये झालेला आहे. जनता पक्षाचे पतन झाल्यानंतर हे झाले होते. तर शिवसेनेचा जन्म हा 1969 चा आहे. शिवसेनेचा पहिला महापौर या मुंबईत शहरात डॉ. गुप्ते हे कधी झाले, त्यावेळी आमचे किती नगरसेवक निवडून आले होते? या संदर्भातील एखादं अभ्यास शिबिर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमध्ये ठेवू. जर कोणाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी यावे.’ असा टोला राऊतांनी लगावला आहे.
पुढे राऊत म्हणाले की, ‘शिवसेनेचे पहिले आमदार वामराव महाडिक हे देखील याच काळात निवडून आले होते. गिरगावमधून प्रमोद नवलकर हे देखील आमदार म्हणून निवडून आलेले होते. माझगावामधून छगन भुजबळ देखील निवडून आले होते. आमचे वाघ मुंबईमधून अनेक वेळा निवडून आलेले आहेत. या गोष्टी भाजपच्या जन्मापूर्वीच्या आहेत. मात्र असंय की, देवेंद्र फडणवीस यांचा तेव्हा मुंबईशी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी जास्त काही संबंध नसेल. या सगळ्या गोष्टी फडणवीस यांच्या जन्माच्या अगोदरच्या आहेत.’ असा चिमटा देखील राऊतांनी काढला आहे.
फडणवीस काय म्हणाले होते ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप-सेना युतीविषयी भाष्य करत मनातील सल बोलून दाखवली होती. 25 वर्षे आम्ही युतीत सडलो असे ठाकरे म्हणाले होते. यावरुन फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले की, ‘सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन गोष्टी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये होते. 25 वर्षे आम्ही युतीमध्ये सडलो असल्याचे ते म्हणाले. मात्र 2012 पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेबांनीच या युतीचा निर्णय केलेला होता. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? असा उलट सवाल फडणवीसांनी केला आहे. तसेच भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवले का? असा विचार मनात येतोय असा टोला देखील फडणवीसांनी ठाकरेंना लगावला होता.
पुढे फडणवीस म्हणाले होते की, ‘तुमचा पक्ष जन्माला येण्यापूर्वी मुंबईमध्ये आमचे नगरसेवक आणि आमदार होते. 1984 मध्ये तुम्ही शिवसेनेच्या नाही तर भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. मनोहर जोशींनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. हे भाजपासोबत सडले असे सांगातत. मात्र भाजपासोबत असताना पहिल्या क्रमांकाचे होते. मात्र सोडल्यानंतर चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाले आहेत’ असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला होता.

