मुंबईतील ताज हॉटेलमध्ये शाही थाटात विवाह संपन्न
मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांचा आज मुंबईत ताज हॉटेलमध्ये विवाह पार पडला आहे.
अनेक दिवसांपासून या विवाहाची चर्चा होती, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांना लग्नासाठी निमंत्रण देण्यासाठी हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील दोघेही गेले होते,आज अखेर हा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. अंकिता पाटील या सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्या काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून काम पाहतात. तसेच अंकिता या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या निर्देशक पदावर कार्यरत आहेत. अंकिता यांचे वडील हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणामधील महत्वाच्या नेत्यांपैकी एक नाव आहे.निहार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. बाळासाहेबांचे दिवंगत पुत्र बिंदूमाधव ठाकरे हे निहार यांचे वडील. बिंदूमाधव यांचं 1996 साली एका अपघातामध्ये निधन झालं. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे असणारे निहार हे मुंबईमधील एक प्रतिष्ठित वकील आहेत.