- सहकारमंत्रीपदी निवडीबद्दल सत्कार
- भेटीची राज्यातील सहकार क्षेत्रात चर्चा
नवी दिल्ली- येथे केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांचेशी महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (दि.10) भेट घेऊन सहकार तसेच इतर विविध विषयांवरती सविस्तर चर्चा केली. या भेटीच्या वेळी या दोन नेत्यांनी देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल माननीय अमित शाह यांचा सत्कार केला.
महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांनी केंद्रीय सहकार मंत्री आमित शाह यांची भेट घेतल्याने राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष या या भेटीने वेधुन घेतले आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्याचे सलग 7 वर्षापेक्षा अधिक काळ सहकार मंत्री होते. तसेच ते पणन मंत्री असताना भारत सरकारने कृषी विपणन संदर्भात नेमलेल्या देशपातळीवरील पणन मंत्र्यांच्या समितीचे अध्यक्षही होते.
देशामध्ये महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये इतर राज्यांच्या तुलनेत सहकार क्षेत्रात आघाडीवर आहेत. केंद्र सरकारने प्रथमच सहकार हे खाते निर्माण केल्याने व या खात्याचे मंत्रीपद अमित शाह यांच्याकडे दिल्याने देशातील सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेते असल्याने अमित शहा यांचेशी झालेल्या भेटीची जोरदार चर्चा राज्यातील सहकार क्षेत्रात सुरू झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील अभ्यास व अनुभवाचा उपयोग भाजपकडून केला जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रातील राजकारणावर सहकार क्षेत्राचा मोठा प्रभाव आहे. राज्यातील सत्तेच्या चाव्या सहकार क्षेत्रावर अवलंबून असल्याचे बोलले जाते. त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्रातील या दोन प्रमुख नेत्यांची अमित शाह यांच्याशी झालेली भेट राज्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ठरेल अशी चर्चा आहे.
अमित शाह यांचेशी हर्षवर्धन पाटील व विखे-पाटलांची चर्चा
Date:

