पुणे : शहरातल्या मंगळवार पेठेतील नव जागृती मित्र मंडळ आणि मंडळाचे अध्यक्ष राहुल शर्मा यांच्या पुढाकाराने हनुमान जयंतीनिमित्त हिंदु-मुस्लिम एकतेचा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे विशेष म्हणजे मुस्लिम बांधव हनुमान चालिसा पठणामध्ये सहभागी झाले होते तर, त्याच उपक्रमात हिंदु बांधवांनी मुस्लिम बांधवांसाठी ईफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

सामाजिक बंधुभाव वाढवणारा हा अनोखा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बजमे रहेबर यंग सर्कल व त्याचे अध्यक्ष इस्माईल खान, बजमे तहा यंग सर्कल व अध्यक्ष साद शेख, युनिटी फ्रेंड सर्कल व अध्यक्ष रफिक शेख यांच्यासह सलीम शेख, प्रशांत चवरे, तारिख शेख, पंकज अगरवाल, जनैद तांबोळी, अक्षय बारसकर, अझहर तांबोळी, प्रतीक सराफ, सैफ मुजावर, सुधीर रणधीर, सलमान शेख यांनी विशेष सहकार्य केले. समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम व पोलीस निरीक्षक संदीप जोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मशिदीवरील भोंग्यावरून महाराष्ट्रात सध्या राजकीय व सामाजिक वातावरण गरम झाले आहे. या पार्श्वभूमीवर हनुमान जयंती निमित्त राहुल शर्मा व त्यांचे नव जागती मित्र मंडळ आणि सहकाऱ्यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखणीय असून त्याची सर्वदूर चर्चा होते आहे. हनुमान जयंती निमित्त हनुमान चालिसाचे पठण केले जात असताना त्यामध्ये मुस्लिम बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यावेळी दुपारी भंडारा होता. त्याचे वाटप करताना मुस्लिम बांधवांनी वाडप्याची भूमिका निभावली. तर, सायंकाळी याच ठिकाणी रमजान निमित्त मुस्लिम बांधवांसाठी हिंदू बांधवांनी ईफ्तार पार्टीचे आयोजन करून वाडप्याची भूमिका निभावली. सर्व मंडळे व मान्यवरांच्या सहभागातून हा अनोखा बंधुभावाचा उपक्रम यशस्वीपणे पार पडताना नवा संदेश देऊन गेला.

