पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद
पुणे – बदलत्या काळात भारतीय महिलांचा कल पाश्चिमात्य कपड्यांकडे जास्त जात आहे. त्यामुळे भारताची पारंपरिक हस्तकला, नक्षीकाम, भरतकाम या कला लोप पावत चालल्या आहेत. या कला वाचवण्याचा प्रयत्न हॅन्ड्स ऑफ इंडियाकडून सुरू आहे. त्याकरता हॅन्ड्स ऑफ इंडियाने भव्य सुती वस्त्रांचे प्रदर्शन टिळक स्मारक मंदिर येथे भरवले आहे. हे प्रदर्शन शुक्रवार १७ मार्च ते मंगळवार २१ मार्चपर्यंत सकाळी ९.३० ते रात्री ८.३० पर्यंत सुरू आहे.
अंगाची लाहीलाही करून सोडणाऱ्या कडक उन्हाळ्यापासून आराम मिळण्यासाठी सुती कपड्यांचा वापर केला जातो. त्यामुळे पुणेकरांनीही पहिल्याच दिवशी प्रदर्शनाच्या ठिकाणी गर्दी केली होती. त्यातही सुती वस्त्रांच्या साहाय्याने बनवलेल्या पाश्चिमात्य पद्धतीच्या वस्त्रांना जास्त मागणी मिळत आहे. यामध्ये पंजाबमधील पुलकारी, उत्तर प्रदेशातील चिकन, पॅटीवर्क व आरी, पश्चिम बंगालमधील कांथा, बिहार सुजनी, काश्मीरमधील लोकप्रिय सोजनी व काशिदा यांसह कर्नाटकातील कासुटी या प्रकारचे भरतकाम केलेली वस्त्रे ही महिलांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.
देशातील विविध भागातील विविध हस्तकलांचे मिश्रण या प्रदर्शनात पाहावयास मिळत आहे. खास उन्हाळ्यासाठी तयार करण्यात आलेला बरामा विणकाम केलेला मेखला कुर्ता, बांधणी कुर्ता, सुती स्कर्ट, डाबका-अजराख कुर्ता, ओरिसातील ब्लेंडेड डाय केलेली पाश्चिमात्य धाटणीची वस्त्रे, सण-मुहूर्तांसाठी चंदेरी सिल्क तसेच कळमकरी, मंगलगिरी, इकत, डोंगरिया, माहेश्वरी, फुलिया साड्या दुपट्टा अशा हॅन्ड्स ऑफ इंडियाची विशेष उत्पादनांना परिसरातील महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
आठवी पास अमित करतो हॅन्ड्स ऑफ इंडियाचे व्यवस्थापन
२०१० साली स्थापन झालेली हॅन्ड्स ऑफ इंडिया ही संस्था भारतातील विविध भागातील विणकर तसेच हस्त-भरतकाम करणाऱ्या लोकांसमवेत काम करते. हॅन्ड्स ऑफ इंडियातर्फे महिलांसाठीचे हातांनी बनवलेले सुती वस्त्र तसेच घरगुती फर्निचर तयार करण्यासाठी या कलाकारांना प्रोत्साहीत केले जाते. हातमाग, हस्तकला हस्त-भरतकाम यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच छोट्या-छोट्या खेड्यांतील गरीब व गरजू मात्र कलेने समृद्ध अशा लोकांच्या हाताला काम मिळवून द्यावे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. त्याचसोबत बदलत्या काळात लोप पावत चाललेली भारताची ही अद्वितीय कला टिकवून ठेवण्याचे हॅन्ड्स ऑफ इंडियाचे प्रयत्न आहेत. वृंदावन येथे संस्थेचे मुख्य कार्यालय असून याठिकाणी अमित नावाचा आठवी पास तरूण हॅन्ड्स ऑफ इंडियाच्या प्रत्येक प्रदर्शनाचे व्यवस्थापन करतो. अमितच्या रुपात संस्थेचे गरीब व गरजूंना काम देण्याचे उद्देशही साध्य होते.