सर्वोत्कृष्ट पटकथा व संवादासाठीच्या पुरस्काराने सन्मानित
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक विभागात निवडलेल्या ‘हलाल’ या सिनेमासाठी निशांत धापसे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा व संवादासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार आमच्यासाठी गौरवाची बाब असून समाजापर्यंत चांगला दृष्टीकोन पोहचवण्याचा केलेल्या प्रयत्नाला मिळालेले हे यश आहे. अशी भावना निर्माते अमोल कागणे यांनी पुरस्कारानंतर व्यक्त केली.
‘हलाल’ च्या स्क्रिनिंगला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद ही लक्षणीय होता. या चित्रपटाच्या खेळासाठी दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील अभिनेत्री प्रितम कागणे लेखक राजन खान निर्माते अमोल कागणे उपस्थित होते. यावेळी बोलताना लेखक राजन खान यांनी ही मानवी वेदनेची कथा असल्याचे सांगितले. महिलांच्या दृष्टीकोनातून हा समाजपरिवर्तनाचा प्रयत्न आहे असे मत दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी व्यक्त केले. मुस्लीम धर्मातील विवाहसंस्थेवर भाष्य करणारा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून त्याला सर्वसामान्य रसिकांची कशी पसंती मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमोल कागणे, लक्ष्मण कागणे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा व संवाद निशांत धापसे यांचे आहेत. छायांकन रमणी रंजनदास याचं असून संकलन निलेश गावंड याचं आहे. संगीताची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली असून आदर्श शिंदे व विजय गटलेवार यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. ‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत या सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर या कलाकारांच्या भूमिका आहेत.

