पुणे, 28 फेब्रुवारी 2022: – पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने स्नूकर या खेळासाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेला अर्जुन पुरस्कार विजेते आणि माजी राष्ट्रीय विजेते देवेंद्र जोशी हे खेळाडूंना मार्गदर्शन करतील.
देवेंद्र जोशी हे १९९५च्या जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचे उपविजेते आहेत. त्याचबरोबर २००१ आणि २००६चे राष्ट्रीय बिलियर्ड्स विजेते आहेत. २००३चे एशियन चॅम्पियनही आहेत. ही कार्यशाळा चार महिने चालणार आहे. पीवायसी क्लबमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेसाठी सर्व सुविधा आयोजकांकडून पुरविल्या जाणार आहेत. यासाठी वेगवेगळ्या पाच बॅचेस तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बॅचमध्ये सात जणांना प्रवेश असेल. प्रत्येक आठवड्यात दोन सराव सत्रही असणार आहेत. कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर एका स्पर्धेचेही आयोजन करण्यात येईल. माजी राष्ट्रीय खेळाडू राजवर्धन जोशी आणि आदित्य देशपांडे हे कार्यशाळेतील सहभागी खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करतील .
नुकतेच देवेंद्र जोशी यांनी एक सत्रही घेतले. त्यात त्यांनी स्नूकर या खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी ही कार्यशाळा किती महत्त्वाची आहे, हे उपस्थितांना समजून सांगितले. या कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी पीवायसीचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव सारंग लागू, बिपिन चोभे हे उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी विशेष अभ्यासक्रम देवेंद्र जोशी यांनी तयार केला आहे. प्रत्येक सहभागावर आयोजकांकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. पीवायसी क्लबच्या सदस्यांबरोबर बाहेरचे हौशी खेळाडूही या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतील, अशी माहिती पीवायसी क्लबच्या बिलियर्ड्स अँड स्नूकर विभागाचे प्रमुख बिपिन चोभे यांनी दिली.अधिक माहितीसाठी इच्छुकांनी पीवायसी क्लब (दूरध्वनी क्रमांक ०२० – ६७६०२०६०) येथे संपर्क साधावा.

