पुणे शहरातील समस्त राजपूत समाजाच्या वतीने आयोजन ; वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची ४८२ वी जयंती
पुणे – ढोल-ताशांचा गजर… बँडचा निनाद… शंख नाद व पुष्पवृष्टी अशा पारंपरिक वातावरणात वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८२ व्या जयंतीनिमित्त पुणे शहरातील समस्त राजपूत समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला.
यावेळी रा.स्व. संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, अजय खेडेकर, डॉ.मिलिंद भोई यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे व पालखीचे पूजन झाले. अॅड. प्रताप परदेशी, किशोर राजपूत, स्वप्नील नाईक, सुदेश काची, शैलेश बढाई, विजय परिहार, राजेश ठाकूर, सोमनाथ परदेशी, रवींद्र परदेशी, मधुबाला परदेशी, विनायक काची, मनिष साळुंके आदींनी सोहळ्याचे आयोजन केले. ब-याच वर्षांनी पुणे शहरातील व उपनगरातील राजपूत समाज एकत्र आला.
महाराणा प्रताप उद्यानातील महाराणा स्मारकातील पुतळ्यास सकाळी पुष्पहार अर्पण व अभिवादन केल्यावर गुणवंत व कर्तबगार व्यक्तिंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.
महाराणा प्रताप यांची जयंती तिथीनुसार मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे ठरले. महाराष्ट्र सरकारने शासन परिपत्रक काढुन राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात महाराणा जयंती शासकीय पध्दतीने साजरी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर वीरशिरोमणी महाराणाजींना शासनाने राष्ट्रपुरुष म्हणून घोषित केल्याने यावर्षी संपुर्ण राज्यांमधे व पुणे शहरात यंदाची जयंती मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक, धार्मिक मिरवणूक व अभिवादन करुन साजरी करण्यात आली.
शोभायात्रेला महाराणा प्रताप उद्यान येथून सुरुवात झाली. चिंचेची तालीम , सेवा मंडळ, फडगेट पोलीस चौकी शितळादेवी चौकातून मिठगंज पोलीस चौकी मार्गे कस्तुरे चौकात समारोप झाला. मिरवणुकीत ढोल ताशा पथक व बँड पथक देखील सहभागी झाले होते. राजस्थानी राजपूत सेवा संघ कात्रज कोंढवा विभागातील समाजबांधव दुचाकी रॅलीद्वारे सहभागी झाले होते. संपूर्ण सोहळ्यात ५ ते ६ हजार समाजबांधवांनी सहभाग घेतला.

