पुणे-मानवतेची शिकवण देणारे महान संत श्री संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त महापालिकेत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, काँग्रेसचे गटनेते श्री आबा बागुल, तसेच महापालिकेतील अधिकारी कुणाल मंडवाले आणि कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले अभिवादन .

मुंबई: संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, संत जगनाडे महाराज यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांना गुरू मानले. त्यामुळेच तुकोबारायांची गाथा आपल्यापर्यंत पोहोचली. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा पाया घातला आणि तुकोबारायांनी कळस रचला असे म्हटले जाते. तुकाराम महाराजांचे अभंग अनमोल ठेवा आहे. त्यांचे अनेक अभंग संत जगनाडे महाराजांनी लिहून ठेवल्यामुळे मराठी आणखी समृद्ध झाली. त्यांनी स्वत:ही उद्बोधक अशा अनेक रचना लिहिल्या. संत जगनाडे महाराजांचे हे योगदान अपूर्व आहे. संत जगनाडे महाराजांच्या पवित्र स्मृतींना त्रिवार अभिवादन.
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात अभिवादन

नवी दिल्ली : ‘संत जगनाडे महाराज’ यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यायमलाल गोयल यांनी ‘संत जगनाडे महाराज’ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी यांनीही संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात‘संत जगनाडे महाराज’जयंती साजरी
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘संत जगनाडे महाराज’ जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी ‘संत जगनाडे महाराज’ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित माहिती अधिकारी अंजु निमसरकर, कमलेश पाटील आणि इतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

