पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गात अनेक तरुण बळी पडतायत. वय झालेल्या लोकांसाठी कोरोना घातक आहे, असं सांगितलं जात असताना आयुष्याचे 62 उन्हाळे अनुभवलेल्या सत्यभामा बाळासाहेब वायाळ या आजीनं कोरोनावर यशस्वीपणे मात केली. तीही अवघ्या दहा दिवसांत! कुटुंबीयांनी सगळी आशाच सोडली असताना शतायु हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सत्यभामा वायाळ यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश मिळविले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सत्यभामा बाळासाहेब वायाळ (वय 62) या काळेवाडीमध्ये कुटुंबासोबत राहतात. पती, दोन मुलं, दोन सुना आणि चार नातवंडं असे हे दहा जणांचे कुटुंब आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा प्रकाश आणि पती बाळासाहेब वायाळ यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घेऊन ते कोरोनामुक्त झाले. त्यानंतर काही दिवसांनी सत्यभामा वायाळ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने मुलांनी त्यांची कोरोना टेस्ट करून घेतली. यामध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
सत्यभामा यांना एकच किडनी असल्यामुळे आणि त्यांच्या वयाचा विचार करता वायाळ कुटुंबीयांना काळजी वाटत होती. एका मित्राच्या सहकार्याने प्रकाश यांनी आपल्या आईला हिंजवडी येथील शतायु हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी आजींचा स्कोअर अठरा आणि ऑक्सिजन लेवल 40 होती. डॉ. एकता माने, डॉ. योगेंद्र पांडे, डॉ. सचिन शिवनितवार यांनी सत्यभामा यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू केले. मात्र, आजींकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता.
प्रकाश वायाळ यांनी सांगितले की, आईला अॅडमिट करून चार-पाच दिवस झाले तरी तिच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता. आम्ही तर सगळी आशाच सोडली होती. परंतु डॉक्टरांनी हार न मानता उपचार सुरू ठेवले आणि चमत्कार घडला. आईची ऑक्सिजन लेवल चाळीसवरून 94 पर्यंत पोहोचली. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आईनं दहा दिवसांत कोरोनावर मात केली आणि सुखरूप घरी आली. योग्य वेळी योग्य उपचार केले तर कोरोना बरा होऊ शकतो. त्यामुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन दातार यांनी केले आहे.
सत्यभामा वायाळ यांना कोरोना ट्रिटमेंट देताना अँटिबायोटिक, स्टेरॉईडस्, रेमेडेसिवीर खूप विचार करून द्यावे लागले. कारण वायाळ यांना एकच किडनी होती. कोणताही साईड इफेक्ट होणार नाही, याची आम्ही पूर्ण काळजी घेत होतो. प्रत्येक औषधाचा योग्य प्रमाणात डोस दिल्यामुळे आम्ही त्यांना कोरोनामुक्त करण्यात यशस्वी झालो.
डॉ. एकता माने, शतायु हॉस्पिटल
कोविडच्या उपचारांमध्ये औषधोपचारांइतकीच रुग्णाची इच्छाशक्ती, त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद महत्त्वाचा असतो. मग रुग्णाचा स्कोअर जास्त असला आणि ऑक्सिजन लेवल जरी कमी असली तरी योग्य उपचार करून रुग्णाला बरे करता येऊ शकते. सत्यभामा वायाळ आजींच्या बाबतीत हेच घडलं.
डॉ. सचिन शिवनितवार, शतायु हॉस्पिटल, हिंजवडी
आईचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे पाहून आम्ही सगळेच घाबरून गेलो होतो. कारण तिचा स्कोअर अठरा आणि ऑक्सिजन लेवल 40 होती. परंतु शतायु हॉस्पिटलचे डॉ. योगेश दातार, डॉ. योगेंद्र पांडे, डॉ. एकता माने आणि त्यांच्या टीमने यशस्वीपणे प्रयत्न करून आईला वाचविले. डॉक्टरांना देवदूत म्हणतात ते खोटे नाही, याचा प्रत्यय आम्हाला आला.
प्रकाश वायाळ, मुलगा
शतायु हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन महिन्यात आम्ही जवळपास साडेसातशे कोरोना रुग्णांना उपचार केले आहे. 20 मार्च 2021 पासून आम्ही हॉस्पिटलमध्ये कोरोना पेशंटना दाखल करून घेण्यास सुरुवात केली. तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्स, अनुभवी स्टाफ, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे मशिन, डायलेसीस सेंटर, 10 बेडचे अद्ययावत आयसीयू, वेंटिलेटर, 8 बेडचे लहान मुलांचे आयसीयू, जनरल वार्ड, स्पेशल रूम असे 70 बेडचे सर्व सोयीसुविधा असणारे शतायु हॉस्पिटल आहे. मावळ, मुळशी आणि परिसरातील रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही शतायु हॉस्पिटलच्या माध्यमातून करत आहे.
योगेश दातार, डायरेक्टर, शतायु हॉस्पिटल

